खाडिलकर कुटुंब रंगले ‘सावरकर भक्ती’त!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तिमत्त्वाची पूजा बांधणारे खाडिलकर कुटुंबाने सुमारे ३५ वर्षांपूर्वी समग्र सावरकर उलगडणाऱ्या ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचा पहिला प्रयोग सुमारे ३५ वर्षांपूर्वी केला होता.आता हेच नाटक खाडिलकरांची नवी पिढी घेऊन येत आहे. मंगळवारी या नाटकाला सुमारे ३५ वर्षे पूर्ण होत असताना खाडिलकर दाम्पत्याचा मुलगा ओंकार, कन्या वेदश्री आणि स्नुषा प्राजक्ता अशी नवी पिढी या नाटकात काम करत आहे.या निमित्ताने पुन्हा संपूर्ण खाडिलकर कुटुंब ‘सावरकर भक्ती’मध्ये रंगलंय.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांत म्हणजेच १९८३ मध्ये माधव खाडिलकर यांनी ‘अनादि मी अनंत मी’ हे नाटक लिहिले होते .सावरकर यांच्या स्मृतिदिनी २६ फेब्रुवारीला या नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे झाला होता. लेखक, दिग्दर्शक असलेल्या माधव खाडिलकर यांनी या नाटकात सावरकरांची भूमिका साकारली होती. तर आशा खाडिलकर यांनी माई सावरकर यांची भूमिका साकारली होती. या नाटकामध्ये बाल सावरकर यांची भूमिका साकारणारा ओंकार आता या नाटकामध्ये सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

याबाबत माहिती देत ओंकार खाडिलकर म्हणाले, ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे आई-बाबांनी १९९० पर्यंत दीडशे प्रयोग केले. सावरकर यांच्या पन्नासाव्या आत्मार्पणदिनी, २६ फेब्रुवारी २०१६ रोजी मी नाटय़ाभिवाचन केले. ते पाहून बाबांनी मला विचारले ‘तू हे नाटक का करत नाहीस’, यानंतर आई-बाबांनी स्थापन केलेल्या ‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट’मार्फत मी या नाटकाची निर्मिती केली.यामध्ये बाबाराव सावरकर यांची पत्नी येसूवहिनी ही भूमिका वेदश्री करत आहे. तर प्राजक्ता ही माई सावरकर यांची भूमिका साकारत आहे.या नाटकात प्राजक्ता ‘जयोस्तुते’ या गीतावर कथक नृत्याविष्कार साकारत आहे .

तसेच या नाटकाबाबत अधिक माहित देत ओंकार खाडिलकर यांनी सांगितले, ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाची संहिता आधुनिक माध्यमात जतन व्हावी या उद्देशातून हे नाटक ध्वनिनाटय़ स्वरूपात आणण्याचे आम्ही ठरविले आहे. नवी पिढी सध्या ऑडिओ बुक आणि वेब सिरीजचा अधिक प्रमाणात वापर करते . त्यामुळे या नाटकाचे ऑडिओ स्वरूपातील ध्वनिमुद्रण करण्यात येत आहे . तसेच हे नाटक चार-पाच भागात ऑडिओ अ‍ॅपद्वारे जतन करण्यात येणार आहे. आणि तसेच प्रेक्षकांना यू-टय़ूबवरही हे नाटक पाहता येईल.