नवीन मालिका ‘मोलकरीण बाई’ छोट्या पडद्यावर

मुंबई : वृत्तसंस्था – आजपर्यंत छोट्यापडद्यावरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. या मालिका खूप कमीवेळेत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत. या मालिकेत घडणाऱ्या घटना बघून त्या जणू आपल्या आजूबाजूला घडत असल्यासारखं आपल्याला वाटत असत. आता अशीच एक आपलीशी वाटणारी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मोलकरीण बाई’ असे या मालिकेचं नाव असणार आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही आज नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची व्यक्ती झालेली आहे. तिच्या असण्याने आयुष्य जितकं सुखकर होतं तितकंच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त होऊन जात. कधी ती ताई, मावशी, कधी काकू तर कधी नुसतीच बाई असलेली ही बाई. कुटुंबातली सदस्य नसली तरी कुटुंबातलाच एकभाग होऊन जाते.

एक दिवस जरी ही कामवाली बाई आली नाही तर नोकरदार महिलांचं दिवसाचं वेळापत्रकच बदलून जात. त्यामुळे कामवालीबाई आपल्या अनेकांच्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती बनून जाते. याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर १८ मार्चपासून सुरू होणार आहे.

घरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकीणींसोबत असणारं हृदयस्पर्शी नातं या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.