कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकाच्या राजकाणात गेल्या आठवड्यात एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भाजपा नेते आणि जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांचा नोकरी देण्यासाठी तरुणीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केल्यानंतर दुस-याच दिवशी जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण रविवारी या प्रकरणाला अचानक वेगळे वळण लागले. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे जारकीहोळी यांच्यासाठी धावून आले आहेत. कुमारस्वामींनी जारकीहोळी यांच्याविरोधातील तक्रारदारावर या प्रकरणी 5 कोटींचा व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्याने पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला.

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याबाबतची एक सेक्स फॉर जॉबची क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी कब्बन पार्क पोलीस ठाण्यात जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यात भाजपच्या काही आमदारांची नावे समोर येत असल्याने तेही धास्तावले होते. पण अचानक कलहळ्ळी यांनी तक्रार मागे घेतली आहे. कुमारस्वामी यांनी याप्रकरणी 5 कोटींचा व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे, असे स्पष्टीकरण दिनेश कलहळ्ळी यांनी दिले आहे. लोक मला फोन करून प्रश्न विचारत आहेत. आता मी बाहेर मोकळेपणाने फिरू शकत नाही. सगळेजण मला संशयाच्या नजरेतून पाहात आहेत म्हणून मी वकिलांचा सल्ला घेऊन तक्रार मागे घेतली आहे. या प्रकरणी 5 कोटीचा व्यवहार झाला या कुमारस्वामी यांच्या आरोपावर तपास होणे गरजेचे असल्याचे मत कलहळ्ळी यांनी व्यक्त केले आहे.