चोरट्यांनी लंपास केले २ लाख रुपयांचे दागिने

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन – घरामधील सर्व सदस्य टेरेसवर झोपल्याचा मोका साधून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह दोन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना वडकी (ता. हवेली ) हद्दीतील तळेवाडी हद्दीत बुधवारी (ता. २९ ) मध्यरात्री घडली.

याप्रकरणी दत्‍तात्रय सोपान गायकवाड (वय – ४८ रा. तळेवाडी, वडकी, ता, हवेली. ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसात तीन अज्ञात चोरट्यांविरोधांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मंगळवारी (ता. २८ ) संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरामधील सर्व सदस्य जेवण करून उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरावरती टेरेसवरती झोपले होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गायकवाड यांच्या पत्नीने घरात कसलातरी आवाज येत आहे म्हणून उठवले. त्यावेळी गायकवाड यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना उठवले व झिन्याचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेरून शटर लावले असल्याने उघडले नाही. त्यांनी सदर बाब नातेवाईकांना फोनवरून सांगितली. परत टेरेसवरती गेले त्यावेळी त्यांना दक्षिण बाजूला असणार्‍या मोकळ्या जागेत लाल रंगाची दुचाकी दिसून आली व काही वेळात दुचाकी जवळ दोन काळ्या रंगाचे ज्याकीट घातलेले दोन युवक व एक पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला युवक दुचाकीवरून जाऊ लागले.

दरम्यान मुलगा अमोल याने टेरेसवरून उडी मारून शटरचा दरवाजा उघडला. व त्या ठिकाणी आलेल्या नातेवाईकासह त्या दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पाठलाग सुरू आहे हे पाहून चोरटे अंधाराचा फायदा घेत दुचाकी जागेवर सोडून पळून गेले. व त्यांच्या दुचाकीवरील पिशवीमध्ये कटावणी, हॅक्सॉ ब्लेड, कुदळीचे पान व दोन काळे जर्किन मिळून आले आहे दुचाकीसह ते पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गायकवाड यांनी घराची पाहणी केली असता चोरट्यांनी बंद दरवाज्याच्या कुलपाचा कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला होता. घरामधील ठेवलेले सर्व साहित्य अस्तव्यस्त अवस्थेत पडले होते. कपाटाची पाहणी केली असता ठेवलेली साठ हजार रुपये रोख रक्कम व एक लाख पंच्यान्नव हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. यावरून चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश उगले करीत आहेत.