कृषी सेवा केंद्र चालक धास्तावले : ‘ती’ औषधे, बियाणे नष्ट करण्याचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ‘पृथ्वी ॲग्रो सर्व्हिसेस’च्या गोदामावर कृषी विभागाने कारवाई केल्यानंतर धास्तावलेल्या जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्र चालकांनी औषधे व बियाणे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेवगाव-नेवासा मार्गावरील कांदा बियाणे फेकून दिल्याचे आढळून आले. लाल कांद्याच्या या पाकिटांची कृषी विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.

पृथ्वी अ‍ॅग्रो सर्विसेस गोदामावर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने छापा टाकून साडेएकोणीस लाख रुपयांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त केली. मुदतबाह्य कीटकनाशकांच्या पाकीटांना नवीन लेबल लावून विकली जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे धास्तावलेल्या काही कृषी सेवा केंद्र चालकांनी आता आपल्याकडील मुदतबाह्य औषधे व बियाणे कारवाईच्या भितीने नष्ट करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. शेवगाव -नेवासा राज्यमार्गावर ढोरा नदीच्या पात्रामध्ये कांदा बियाणाचे मुदत संपलेली पाकीटे आढळली असून, या कांदा बियाणाच्या पाकिटावर एका नामांकीत कंपनीचे लेबल आहे. ही लाल कांद्याच्या बियाणांची पाकीटे मोठ्या प्रमाणात नदीपात्रात उघड्यावर फेकून दिलेले आढळले आहे.

सलग दोन वर्षांपासून पाऊस कमी असल्यामुळे बियाणांची विक्री झाली नाही. त्यामुळे जुनी बियाणे तशीच आहेत. हीच मुदतबाह्य बियाणे शेतकऱ्यांना विकली जात होती. परंतु पृथ्वी ॲग्रोवरील कारवाईनंतर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालक चांगलेच धास्तावले आहेत.