सत्ताधाऱ्यांनी राज्याला कर्जबाजारी केलं : अजित पवार

यवतमाळ : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्र्रातील पहिला टप्पा उरकल्यानंतर आता ही यात्रा विदर्भात पोहोचली असून याठिकाणी मोठ्या उत्साहात या यात्रेचे स्वागत करण्यात आले.  यावेळी यवतमाळमधील दारव्हा येथे मंगळवारी जाहीर सभा पार पडली.

याठिकाणी झालेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व पक्षाचे नेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग हे उपस्थित होते. यावेळी सभेत अजित पवार यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, या सरकारने पाच वर्षात राज्याला फक्त कर्जबाजारी करण्याचे काम केले असून जर आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या आणि युती सरकारच्या पाच वर्षांच्या कालखंडाची तुलना केली तर या सरकारने फक्त महाराष्ट्राला कर्जबाजारी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी टीका करताना म्हटले कि, शेतकऱ्यांची सर्वात वाईट अवस्था असून राज्यात अराजकता पसरली आहे. भाषणात त्यांनी राजीव गांधी यांच्या जयंतीचा उल्लेख करत म्हटले कि, राजीव गांधी यांची आज जयंती असून खऱ्या अर्थाने त्यांनी संगणक आणि इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडवली. त्याचबरोबर राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी संपावर जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या भाषणात टीका करताना म्हटले कि, आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून अनेक कंपन्या बंद पडायच्या मार्गावर आहेत.

मुख्यमंत्र्यांशी वादविवाद घालण्यास तयार

यावेळी धनंजय मुंढे यांनी देखील वाशीम येथे झालेल्या सभेत ‘राजकीय भ्रष्टाचार या विषयावर आपण मुख्यमंत्र्यांबरोबर वादविवाद करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जनतेला दिसेल असे काम केल्यास मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रेची गरज पडली नसती’, अशी टीकाही मुंडे यांनी यावेळी केली.

मनोहर नाईक शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असलेल्या आमदार मनोहर नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची तयारी केली असल्याची माहिती समोर येत असताना आता ते आज यवतमाळमध्ये होणाऱ्या या यात्रेच्या सभेसाठी सज्ज झाले असून त्यांनी कार्यकर्त्यांना देखील सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

You might also like