आयुष्यमान भारत योजनेपासून लाभार्थी वंचित 

पोलीसनामा ऑनलाईन – आयुष्यमान भारत योजनेतून गोरगरिब जनतेला पाच लाख रूपयांपर्यंतचे उपचार हे मोफत मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून सबंधित विमा कंपन्यांना पहिल्या टप्प्यातील ४५० कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत ६५० जणांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे. मतालुक्यातील काम संथ गतीने सुरू आहे.

१ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेची सुरूवात केली. यामध्ये २०११ च्या बेसलाईन सव्र्हेनुसार वार्षिक २ लाख ४० हजार रूपये उत्पन्न असणाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होणे अपेक्षित आहे. योजना जाहीर झाल्यापासून तीन महिन्यात यासाठीचे सर्वेक्षण होवून, लाभार्थ्यांंची यादी प्रसिध्द करण्याचे व ओळखपत्र देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तालुका स्तरावर आशा स्वंयसेविकांवर त्याची जबाबदारी देण्यात आलेली होती. यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजीही करण्यात आलेली होती. प्रत्यक्षात याबाबतचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. आयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरीबांना पाच लाख रूपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करीत या योजनेची सुरूवात करण्यात आली. मात्र, पंढरपूर शहर व तालुक्यात या या योजनेचे ओळखपत्र पात्र लाभार्थ्यांना अद्याप मिळालेली नाहीत. यामुळे अनेकांना या योजनेच्या लाभापासून संचित रहावे लागत आहे.

शिवशंभु संघटना यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले असून, लाभार्थी निवडीसाठी २०११ ऐवजी २०१८ बेसलाईन धरून नवीन लाभार्थ्यांचा समावेश यामध्ये करण्यात यावा. ओळखपत्र वाटपाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. अशीही मागणी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे. प्रांताधिकारी कार्यालय येथे मनोज श्रोत्री यांनी निवेदन स्विकारले. यावेळी शिवशंभु संघटनेचे संस्थापक महादेव पवार, राहुल नाईकनवरे, संजय गायकवाड, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.