सांगली : गौरव नायकवडी चौकशीसाठी सांगली पोलिसांच्या ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – वाळव्यातील कुख्यात गुंड चन्या मुळीक याच्या खून प्रकरणी वाळव्यातील युवक नेते गौरव नायकवडी यांना रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी याप्रकरणी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. चन्या मुळीक खून प्रकरणी गौरव नायकवडी यांची मध्य रात्रीपर्यंत कसून चौकशी सुरु होती. दरम्यान गौरव नायकवडी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं समजताच वाळवा परिसरातून समर्थकांची मोठी गर्दी पोलीस मुख्यालयासमोर झाली होती.

३ जून २०१९ रोजी गुंड चन्या मुळीक याचा मृतदेह औदंबर येथील कृष्णेच्या नदी पात्रात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. चन्या हा वाळव्यातील नामचीन गुंड असल्याने त्याची खुनाची बातमी सर्वत्र पसरताच वाळवा परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये एका मोठ्या युवा नेत्याचा हात असल्याची चर्चा परिसरात जोरदार सुरु होती. भिलवडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरगुडे यांनी या गुन्ह्याचा तपास तातडीने करत काही संशयितांना अटक केली होती. मात्र चन्याच्या खून प्रकरणात गौरव नायकवडी यांचा थेट संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी चन्याच्या वडिलांनी केला होता. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

रविवारी सायंकाळी गौरव नायकवडी स्वतः हून पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले. प्रथम आष्टा पोलीस ठाण्यात त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सांगली मध्ये पोलीस अधीक्षकांनी काही काळ या प्रकरणाबाबत चौकशी केली. पुढील चौकशीसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना ताब्यात घेतले. स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी गौरव नायकवडी यांच्याकडे चन्या खून प्रकरणी कसून चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. गौरव नायकवडी यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने त्यांना पोलिसात हजार राहण्यास सांगितल्याची चर्चा होती. त्यानुसार ते चौकशीसाठी हजार झाल्याचं बोललं जात होत, मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वाळव्यातील गुंड रजनीश उर्फ चन्या मुळीक खून प्रकरणी गौरव नायकवडी यांची चौकशी सुरु आहे. ते स्वतः चौकशीसाठी हजर झाले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

You might also like