ठेकेदार कोठारीची अपूर्ण 19 कामे केली रद्द ; महापालिका आयुक्त भालसिंग यांचा दणका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली ठेकेदार ए. सी. कोठारी यांची अपूर्ण 19 कामे रद्द करण्याचा बांधकाम विभागाचा प्रस्ताव आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांचा लाडके असलेल्या कोठारी यांना मोठा झटका बसला आहे.

अनेक वर्षांपासून महापालिकेचे काम करणारे ठेकेदार कोठारी यांनी तब्बल 19 कामे अपूर्ण ठेवली आहेत. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर विहित वेळेत सदर कामे पूर्ण केली नव्हती. बोल्हेगाव येथील अपूर्ण कामावरूनच नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणी शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर बांधकाम विभाग अपूर्ण कामे ठेवणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध अधिक आक्रमक झाला आहे. ठेकेदार कोठारी यांची अपूर्ण कामे रद्द करण्यात यावी, असा प्रस्ताव बांधकाम विभागाच्यावतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आला होता. सदर प्रस्तावावरून आयुक्तांनी ठेकेदार कोठारी यांची अपूर्ण 19 कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोठारी यास मोठा झटका बसला आहे.

कोठारी हा महापालिकेतील सर्वपक्षीयांचा स्नेही आहे. पालिकेवर कुणाची सत्ता असली, तरी महापालिकेशी कामे त्यांच्याकडे जातात. आता त्यांचीच कामे रद्द केल्याने मोठा धक्का मानला जात आहे.