TV मालिकेत बाल कलाकाराचे काम देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मालिकेमध्ये बाल कलाकाराचे काम देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यावसायिकाला त्याच्या मुलासाठी एका खासगी दूरचित्रवाणीवरील मालिकेत बाल कलाकाराचे काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ५५ हजार रुपये घेऊन काम न देता आर्थिक फसवणूक केली.

वैभव महेश (रा. कृष्णानगर, मध्यप्रदेश) आणि जयंत सिंह तोमर (रा. गोरेगाव, मुंबई) यांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांनी बालकलाकारांना मालिकेमध्ये संधी देण्याची जाहिरात दिली होती. ही जाहिरात वाचून एनआयबीएम रस्त्यावर राहणाऱ्या एका व्यावसायिकाने वैभव आणि जयंत यांच्याशी संपर्क साधला. व्यावसायिकाला त्यांच्या १२ वर्षाच्या मुलाला मालिकेत बालकलाकाराचे काम मिळवून देण्याचे आमिष दोघांनी दाखवले त्यासाठी त्यांनी व्यावसायिकाकडे ५५ हजार रुपयांची मागणी केली.

व्यवसायिकाने आरोपींनी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले. पैसे जमा करून देखील काम मिळाले नसल्याने व्यासयायिकाने वैभव आणि जयंत यांना संपर्क साधला. त्यावेळी दोघांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like