‘त्या’ बँकेत वृद्ध, भूमिहीन शेतमजुरांच्या कर्जप्रकरणात लाखोंचा अपहार : उपोषणाचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत वृद्ध, अपंग, निराधार यांच्यासाठी असलेल्या योजनेच्या निधीत शाखा व्यवस्थापक व क्लार्क यांनी अपहार केला आहे. त्यामुळे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे पत्र सभासद विनायक गोस्वामी, बँकेचे ४ विद्यमान संचालक, व वृद्ध भूमिहीन शेत मजुर महिला संघटना कर्जत यांनी जिल्हाअधिकारी, प्रांतआधिकारी, कर्जत तहसीलदार कर्जत यांना दिले आहे.

बँकेचे कर्जत शाखाधिकारी सदाशिव फरांदे व क्लार्क दीपक अनारसे यांनी परस्पर मयत लाभार्थ्यांच्या खात्यातील रक्कमेची विल्हेवाट लावली आहे. याबाबत तहसीलदार यांनी तपासणी करावी व संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, असे पत्र बँकेचे संचालक सुदाम कोथिंबीरे, बबनराव सालके, संतोष यादव, बापू दरेकर, यांनी व वृद्ध भूमिहीन शेत मजूर संघटनेचे तालुका अध्यक्ष शब्बीरभाई पठान यांनी प्रांत आधिकारी कर्जत, तहसीलदार कर्ज यांना तर सभासद विनायक गोस्वामी यांनी “आपले सरकार ” या पोर्टलवर तक्रार केली आहे.

या सर्वांच्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, संचालक श्रीकांत तोरडमल यांच्या संगनमताने शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांदे, लिपिक दीपक अनारसे, यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निराधार वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेतील मयत लाभार्थी यांच्या नावावर आलेली रक्कम शाखाअधिकारी सदाशिव फरांदे व दीपक आनरसे यांचे नातेवाईक असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा करून ती रक्कम काढण्यात आली आहे. यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास १६सप्टेबर रोजी प्रांत कार्यालया समोर उपोषण करणार असल्याचे शब्बीरभाई पठान यांनी सांगितले.

दरम्यान, कर्जत शाखेत बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांच्या हितसंबंधामूळे शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांदे व क्लार्क दीपक अनारसे गेली १० वर्ष कर्जत शाखेत कार्यरत असल्याने यांनी बँकेत मनमानी कारभार करत अनेक ठिकाणी गैरकारभार व अपहार केल्याचा आरोप बँकेतील चार संचालक व खातेदारांनी केला आहे. तसेच अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, संजय कोरडे यांच्यावरही शिरूर, पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अपहार, गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल असल्याने बँकेचे सभासद गोस्वामी व इतरांनी व्यवहारे, कोरडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अपहार दडपवण्यासाठी लिपीक निलंबित!
योजनांतील अपहारप्रकरणी कोरडे, व्यवहारे, फरांदे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी लिपीक अनारसे याला निलंबित केले आहे. संचालक मंडळाकडे अनारसे यांच्याबाबत तोंडी तक्रारी आल्याने मागील दोन महिन्यांपूर्वी अनारसे यांची बदली श्रीगोंदा येथे केली होती. मात्र श्रीगोंदा येथे बदली असतानाही कोरडे, व्यवहारे, फरांदे यांनी निराधार योजनेतील मासिक रक्कम जमा करण्यासाठी अनारसे याला कर्जत येथे बोलवून रक्कम जमा केली जात असे. यात व्यवहारे, कोरडे यांचा हितसंबंध दडल्याचा आरोप तक्रारदार सभासद विनायक गोस्वामी यांनी केला आहे.

गुन्हा दाखल करा अन्यथा जिल्हाभर आंदोलन
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत शाखा आधिकारी व क्लार्क याने गोरगरीब वृद्ध माता-पित्यांचे पैसे हडप केले आहे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व बँक संचालक मंडळाने त्यांना पाठीशी न घालता त्यांना बडतर्फ करावे अन्यथा जिल्हाभर आंदोलन करु, असा इशारा श्रावण बाळ योजना माता-पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –