धक्कादायक ! पबजी गेममुळे तरुणाचा जीव धोक्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुलांना लागणारे ऑनलाईन गेम चे व्यसन हे जगभरातील पालकांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. या व्यसनापायी कित्येकांनी आपला जीवही गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता यासंदर्भात कोल्हापूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली असून सातत्याने पबजी खेळल्याने हे व्यसन महाविद्यालयीन तरुणाच्या जिवावर बेतण्याची वेळ आली. डॉक्टरांनी त्याला मानसिक उपचारांची गरज असल्याचे सांगितले.

असे आहे प्रकरण :
हा महाविद्यालयीन तरुण गेल्या काही दिवसांपासून एकांतात राहून सातत्याने मोबाईल गेम पबाजी खेळत होता. तो सातत्याने मोबाईलवर पबजी खेळत असे आणि मोबाईल काढून घेतला तर तो आई-वडीलांशी वादावादी करीत असे. कोणाशीही जास्त न बोलता तो सातत्याने बंद खोलीत एकटाच बसून राहत असे. तो अचानक मोठ्याने आरडाओरड करु लागल्याने कुटुंबीय घाबरले. त्यानंतर तो अधिकच वेड्यासारखे करू लागल्याने त्याला शुक्रवारी दवाखान्यात उपचारासाठी आणले. येथे आणले असता त्याचे डोळे पूर्णपणे झळकले होते आणि तो अत्यंत हिंस्रपणे वागत होता. इतके कि डॉक्टर तपासत असताना त्याचे हातपाय धरून ठेवावे लागत होते. पहिल्यांदा विटांनी त्याला काहीतरी औषध पाजल्याची शंका समोर आली मात्र तो फक्त कोल्ड्रिंक्स पिल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला व्यवस्थित तपासून पबजी गेमचा त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम झाला असून आता त्याला मानसिक उपचारांची गरज असल्याचे सांगितले.

रुग्णालयातून त्याला घरी आणण्यात आले परंतु तो आता काहीही असंबद्ध बडबड करत असून कोणाचेही काहीच म्हणणे ऐकून घेत नाही. बाह्य जगाचे काहीही भान त्याला राहिले नसून वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असल्याने तात्काळ त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यास डॉक्टरांनी सांगितले.

काय आहे ‘पबजी’ गेम :
प्लेयर्स अननोन बॅटल ग्राउंड (Players Unknown Battle Ground) असा या लोकप्रिय गेम चा फुलफॉर्म असून भारतात या गेमवर बंदी आणावी अशी मागणी जोर धरत आहे. अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झालेल्या या गेम वर गुजरातमध्ये एका महिन्यासाठी बंदीदेखील घातली होती. या काळात गेम खेळणाऱ्या १६ लोकांना अटकदेखील झालेली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पबजी गेम मुळे युवकांवर गंभीर मानसिक परिणाम होत असून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढत आहे. याच वर्षी सलग ६ तास पबजी खेळल्यामुळे मध्यप्रदेश येथील युवकाचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त –