मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे गडकरी राज्यात येणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान मी राज्यात काही काळच असून पक्षाने दिल्लीत बोलवले तर जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य करून त्यांनी आगामी काळात दिल्लीत जाणार असल्याचे बोलून दाखवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत भाजपाला बहुमत मिळाल्यास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्रात पाठवून मुख्यमंत्री पदी नेमणूक होणार असल्याची अशी चर्चा गडकरी यांच्या कार्य़कर्त्यांमध्ये आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिल्लीला जाण्याचे संकेत दिले आहेत. मध्यंतरी मराठा आरक्षण आंदोलन नीट हाताळता न आल्याची टीका करत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा भाजपामध्ये रंगल्या होत्या. त्यावेळी नितीन गडकरी यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यावेळी नितीन गडकरी यांनी आपण दिल्लीमध्येच राहणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे सांगितले होते.

मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याचे संकेत दिल्याने नितीन गडकरी यांना राज्यात पाठवून त्यांच्याकडे राज्याची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर नितीन गडकरी यांना राज्यात पाठवून त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये बोलावले जाणार असल्याचे बोलले जातेय. दरम्यान, अमित शहा यांनी आगामी विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लढवण्यात येतील असा खुलासा दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केला होता. मात्र, आता खुद्द फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याची तयारी दाखवल्याने नितीन गडकरी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेला पुन्हा उधान आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like