काकाच्या लैंगिक छळाला कंटाळून पुतणीची आत्महत्या

पिंपरी : चुलत्याकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून सतरा वर्षीय पुतणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चुलत्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलगी सुटीसाठी औरंगाबाद येथे चुलत्याच्या घरी गेली होती. त्यावेळी चुलत्याने अश्‍लील वर्तन केले व नंतर अश्‍लील मेसेज पाठवून त्रास देत असल्याचे मृत मुलीने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हंटले आहे.

दरम्यान, नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पुतणीबाबत वडिलांसमान असणाऱ्या चुलत्याकडूनच असा प्रकार घडल्याने कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला.
याबाबत मिळालेली अधिकी माहिती की, फिर्यादीची मुलगी सुटीसाठी औरंगाबाद येथे चुलत्याच्या घरी गेली होती. तेथे चुलत्याने तिच्याशी अश्‍लील वर्तन करीत वियनभंग केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलगी भोसरीतील तिच्या घरी आली आल्यानंतरही चुलता वारंवार अश्‍लील मेसेज पाठवून तिला त्रास देत होता. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून मुलीने ६ सप्टेंबरला भोसरीतील राहत्या घराच्या इमारतीच्या गॅलरीतून उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी होऊन ती बेशुद्ध पडली. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, त्या मुलीच्या रूममधील ड्रॉवरमध्ये सापडलेल्या चिठ्ठीत चुलता देत असलेल्या त्रासाबाबत मुलीने नमूद केले होते. त्यानुसार कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून लैंगिक अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चुलत्यावर गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.