कार्ड क्लोनिंग करणाऱ्या नायजेरियन टोळीचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- शहर व परिसरातील एटीएम सेंटरमध्ये स्कीमर बसवून त्याद्वारे कार्ड क्लोनिंग करून लाखो रुपयांची फसवणूक कऱणाऱ्या नायजेरियन टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी नायजेरियन तरुण-तरूणीला अटक केली असून त्यांनी शहरातील ४० ते ५० लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये लंपास केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी दिली.

इरमेहन स्टिवे व अयान महेबुबा जुमा (मुळ नायजेरिया) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यातील इरमेहन स्टिवे याला यापुर्वी खडकी आणि सांगवी परिसरात अशाच प्रकारे कार्ड क्लोनिंग करून चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर यासंदर्भात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री परिसरात राहणारे संबीतकुमार प्रमोद मिश्रा यांच्या डेबीट कार्डचा वापर करून अज्ञाताने खात्यातील दरमिनीटाला १ हजार रुपयांप्रमाणे १० हजार रुपये व इतर असे एकूण ९२ हजार रुपये लंपास केले होते. त्याची माहिती त्यांनी अप्पर पोलीस आय़ुक्त सुनील फुलारी यांना दिली होती. त्याप्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथकाने त्याअनुषंगाने हद्दीतील एटीएमचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यावेळी पोलीस नाईक जयवंत चव्हाण आणि अमित साळुंके यांना दोघे दिसले. त्यांनी चौकशी केली तेव्हा ते दोघे उंड्री येथे मॅजेस्टिक सोसायटीमध्ये राहात असल्याची माहिती समोर आली. त्यावेळी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास अचानक तेथे जाऊन लागलीच त्यांना अटक केली. त्यांच्याकडून एटीएम कार्ड क्लोनिंग करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, त्यात ३ लॅपटॉप, २ स्कॅनर, २ पेनड्राईव्ह, इन्ट्रूमेंट पॅड, ग्लू गन, डमी एटीएम कार्ड, २ सीडी डिस्क, नेट डोंगल, ५ मोबाईल, वेगवेगळ्या बँकेचे १९ एटीएम व क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघकिस येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सायबर पोलीस ठाणे शिवाजीनगर मुख्यालय येथे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्याशी ९८२३०१५१०० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच उंड्री, कोंढवा, येवलेवाडी, कात्रज बिबवेवाडी, गोकुळनगर, साईनगर येथील नागरिकांनी खबरदारी म्हणून आपल्या कार्डचे पीन बदलून घ्यावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बँका गाफलच
बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये वारंवार चोरट्यांनी घुसखोरी करून अशा प्रकारे नागरिकांची लाखो रुपयांची रोकड लंपास केली जात आहे. यासंदर्भात वारंवार बँकांना खबरदारीचे उपाय करण्यासंदर्भात सुचना पोलिसांनी बैठका घेऊन दिल्या आहेत. त्यासोबतच यापुर्वी बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक असायचे तेही आता काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आवर घालणे अवघड बनले आहे. असे अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी सांगितले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, कर्मचारी राजस शेख, इक्बाल शेख, विलास तोगे, विलास ढोले, जयंत चव्हाण, अमित साळुंके, सुशील धिवार, आदर्श चव्हाण, उमेश शेलार, किरण मोरे, योगेश कुंभार, निलेश वणवे, संजीव कळंबे, पृथ्वीराज पांडुळे, सुरेंद्र कोळगे, उमाकांत स्वामी, अजिम शेख, जगदिश पाटील यांच्या पथकाने केली. कार्ड क्लोनिंग करणाऱ्या नायजेरियन टोळीचा पर्दाफाश.