निलेश घायवाळ टोळीतील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हॉटेल व्यवस्थापकाला आणि ग्राहकांना मारहाण करुन हॉटेलमध्ये दरोडा टाकणाऱ्या निलेश घायवाळ टोळीतील आणि मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने सापळा रचून अटक केली. हा प्रकार १२ नोव्हेंबर २०१७ मध्ये बंडगार्डन येथील हॉटेल इथोनिशिया, एम क्युबयेथे घडला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.
याप्रकरणात पोलिसांनी ९ जणांना पूर्वीच अटक केली असून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.२८) पौड रोड भागातील किनारा हॉटेलजवळ करण्यात आली.

अजय उर्फ राहुल भोला गोसावी (वय-३४ रा. गुजरात कॉलनी, कोथरुड मुळ रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील दिपक आमले हा अद्याप फरार आहे. पोलिसांनी या गुन्ह्यमध्ये निलेश बन्सीलाल घायवळ, सागर सोनबा जोगावडे, महेश बाळासाहेब आदवडे, अक्षय दिलीप गोगावले, संदिप राम फाटक, संतोष उर्फ दादू नागु कांबळे, स्वप्नील उर्फ मुन्ना सुखदेव रॉय, पंक्या उर्फ पंकज सुरेश वाभिंरे, बबन बाळासाहेब कोरे या आरोपींनी पूर्वीच अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील फरार आरोपी राहुल गोसावी हा पौड रोड भागात फिरत असून तो किनारा हॉटेल जवळ असल्याची माहीती युनिट ३ चे सहायक पोलीस फौजदार अनिल शिंदे व पोलीस हवालदार प्रविण तापकीर यांना मिळाली. पोलिसांनी किनारा हॉटेल परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. राहुल गोसावी याच्या विरुद्ध २०१२ साली कोल्हापूर येथे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी राहुल गोसावी याला अे. एस. महात्मे यांच्या विशेष न्यायालयात (मोक्का) हजर करण्यात आले असता आरोपीला ५ जानेवारी २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, गुन्हे-१चे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक निकम, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलीस फौजदार अनिल शिंदे, प्रविण तापकीर, दत्तात्रय गरुड, प्रशांत पवार, सचिन गायकवाड, सुजीत पवार, संभाजी नाईक, रामदास गोणते यांनी केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख करीत आहेत.