CM ला Lockdown शिवाय काहीच दिसत नाही ! ‘मातोश्री’चं नाव बदलून ‘लॉकडाऊन’ करा, निलेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंवर ‘प्रहार’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याच दरम्यान, लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री एक दोन दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत विविध नेत्यांची मते वेगवेगळी आहेत. लॉकडाऊनवरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जोरदार प्रहार केला आहे.

मुख्यमंत्री राज्याला भीकेला लावणार, या मुख्यमंत्र्याला लॉकडाऊन शिवाय काहीच दिसत नाही. त्यांचा पहिला, मधला आणि शेवटचा उपाय हा लॉकडाऊनच आहे. ते लॉकडाऊनशिवाय काहीच बोलत नाहीत. त्यामुळे ‘मातोश्री’चं नाव बदलून ‘लॉकडाऊन’ करा अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या निर्णयासंदर्भात निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा उडालेला बोजवारा सप्रमाण दाखवून दिला. या संदर्भात लवकरच जनहित याचिकाही दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

निलेश राणे पुढे म्हणाले, कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. मुख्यमंत्र्यांना काही कळतं की नाही हेच मला कळत नाही. काही दिवसांनंतर राज्यातील लोक एकमेकांना खातील अशी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. राज्यातील नागरिक भुकेने मरतील. यांच्या एसओपी कोण तयार करतं ? हेच कळत नाही. शिवाय, याबाबत मुख्यमंत्र्यांना काही कळतं की नाही ? अशी टीका देखील यावेळी निलेश राणे यांनी केली. कोरोनाच्या नावावर अनेकांनी हात धुवून घेतले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात देखील गंभीर परिस्थिती आहे. मंत्री उदय सामंत म्हणतात 2 हजार बेड आहेत. मग ते कुठे आहेत ? जिल्ह्याला कोणीही वाली नाही, पालकमंत्री येत नाहीत, ते वसुलीत व्यस्त असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

सध्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सामान्य लोकांची यात काय चूक ? त्यांनी या स्थितीत काय करावं ? मेडिकल स्टाफ उपलब्ध नाही. तज्ज्ञांची कमी आहे. अशा वेळेला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावा कसा काय करु शकता ? असे प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केले. त्यातच जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नाही आणि जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा सुट्टीवर आहेत.

भास्कर जाधव आले आणि त्या दोघांमध्ये काहीतरी झालं आणि जिल्हाधिकारी सुट्टीवर गेले. या सर्व प्रकरणाकडे कुणाचं कसं लक्ष नाही ? याबाबत कोण जाब विचारणार आहे की नाही ? लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला ? हा एक ऑर्गनाईज क्राईम आहे. या सर्वांना मोक्का लावला पाहिजे. याबाबत मी लवकरच एक लिटीगेशन फाईल करणार असल्याची माहिती निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.