नीरव मोदीमुळे जीवन उद्ध्वस्त; बहिण पूर्वी मेहताचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   पंजाब नॅशनल बॅंकेला (PNB) तब्बल 11 हजार 400 कोटीला चूना लावून पळून गेलेला मुख्य आरोपी आणि फरारी घोषित केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ED कडून दाखल केलेल्या खटल्यांमध्ये आता बहीण पूर्वी मेहता आणि तिचे पती मयंक मेहता माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाले आहेत. या दोघांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला असून तो मंजुरही केला आहे.

मुंबईत स्थापन केलेल्या विशेष पीएमएलए ( प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयात ईडीकडून खटला दाखल केला आहे. मोदीची बहीण पूर्वी मेहता आणि तिचे पती मयंक मेहता यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज दाखल केला होता. नीरव मोदीमुळे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या कथित गुन्हेगारी कृत्यांमुळे आमच्या दोघांचेही खासगी आणि व्यवसायिक जीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. अनेक आघाड्यांवर मोठा फटका बसला आहे, आता आम्हाला नीरव मोदीपासून दूर राहायचे आहे. यासह मोदी प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे सादर करू शकतो, असे या दोघानीही न्यायालयाला सांगितले आहे.

पूर्वी मेहता यांच्याकडे बेल्जियमचे नागरिकत्व असून, त्यांचे पती मयंक मेहता हे ब्रिटीश नागरिक आहेत. जागतिक पातळीवरील कोरोना संकटामुळे भारतात येऊ शकत नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर आपली साक्ष नोंदवू शकतो, असे मयंक मेहता यांच्याकडून सांगण्यात आले होते. ईडीला सहकार्य करत माफीचे साक्षीदार होऊन महत्त्वाचे खुलासे करू शकतो. यामुळे अन्य आरोपींवरील आरोप सिद्ध होण्यास मदत होऊ शकते, असेही पूर्वी आणि मयंक मेहता यांच्याकडून सांगण्यात आले आहे.