Nitesh Rane | नितेश राणेंचे जरांगेंना आव्हान, ”सागर बंगल्याची भिंत ओलांडून दाखवा, त्यांच्या स्क्रिप्टमधून तुतारीचा वास”

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला मला मारायचंच असेल, तर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा, असे जरांगे यांनी म्हटले आहे. (Nitesh Rane)

यावर आता भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावर जरांगे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नितेश राणे यांनी म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी? त्यांनी हा लढा कशासाठी सुरू केला होता? मनोज जरांगे जी स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत, ती नेमकी कुणाची आहे? कारण आम्हाला या स्क्रिप्टमधून तुतारीचा वास येत आहे.

नितेश राणे म्हणाले, हा लढा मराठा समाजाचा असल्याने तो समाजापर्यंत मर्यादित ठेवा. जर आमच्या नेत्यावर आरोप करण्याचे राजकारण केले आणि खालच्या पातळीवर येऊन टीका केली. तर सागर बंगल्याची भिंतही त्यांना ओलांडता येणार नाही.

नितेश राणे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यामुळेच मराठा समाजानेही फडणवीस यांना स्वीकारले आहे. मनोज जरांगे यांचे समाधान होत नाही म्हणून ते फडणवीसांवर टीका करत असतील तर आम्हीही मराठेच आहोत. त्यांना तोंड देण्यासाठी ठामपणे उभे आहोत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

धक्कादायक! मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, मला सलाईनमध्ये विष…