मराठा तरूणांकडे कर्जासाठी तारण मागणाऱ्या बँकांना नितेश राणेंची धमकी

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन-बँका मराठा तरुणांना कर्जासाठी तारण ठेवायला सांगत आहेत. परंतु तारण ठेवण्यासारखी परिस्थिती मराठ्यांमध्ये असती, तर बँकेत कशाला आले असते. त्यामुळे मराठा तरुण, बेरोजगारांकडून बँकांनी अशा प्रकारची मागणी करणे गैर आहे. मराठा तरुणांना कर्जासाठी तारण मागणाऱ्या बँकांनी त्यांच्या कार्यालयाचे दरवाजे, खिडक्या काचेच्या आहेत हे लक्षात ठेवावे. त्यामुळे असा प्रकार करणाऱ्या बँकांची गाठ आमच्याशी आहे, अशी धमकी काँग्रेस आमदार आणि नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांनी बँकांना दिली आहे.

नितेश राणे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकत्यांची भेट घेतली. आपण हिवाळी अधिवेशनाच्या ९ दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या दिरंगाई संदर्भात सरकारला जाब विचारू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या ९ दिवसात मराठा समाजाच्या प्रश्नावर काही बोललोच नाही, तर आम्हाला तुम्ही कधीही विचारू शकता असेही ते म्हणाले.

मराठा आंदोलन उपोषणकर्त्यांनी राज्यातील तरुणांना महामंडळाकडून मिळणाऱ्या कर्जासंदर्भात अनेक प्रकारच्या अडचणी येत असल्याचे सांगितले. तसेच महामंडळाचे कर्ज सबसिडीच्या माध्यमातून दिले पाहिजे, यावर आपण काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती उपोषणकर्त्यांनी केली. तेव्हा त्यांनी बँका कर्ज देत नसतील तर आम्हाला पक्के माहीत आहे. कोणाला कुठे धारेवर धरायचे. त्यामुळे येत्या काळामध्ये मराठा तरुणांना सबसिडीच्या माध्यमातून कर्ज मिळतील यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.

राणे समितीने १६ टक्के मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. राणे समिती नसती, तर हा आकडा ८ ते १० पेक्षा कमी असता. या समितीवर टीका करणाऱ्यांना काही कळत नाही. शिवसेनेला मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न याचे काही पडलेले नाही. त्यांना फक्त पैसा दिसतो, असे म्हणत निलेश यांनी शिवसेनेवरही टीका केली.