धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही नाही : शाहिद आफ्रिदी

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – कोणीही धोनीला निवृत्त होण्याचा सल्ला देऊ नये असे वक्तव्य करत माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने धोनीची पाठराखण केली आहे. अनेक माजी क्रिकेटर आणि क्रीडा समीक्षकांनी धोनीला निवृत्तीचा सल्लादेखील दिला आहे. याचे कारण असे की महेंद्रसिंग धोनी सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका केली जात आहे. भारतीय क्रिकेट संघाला दोन विश्वचषक जिंकून देणारा स्टार क्रिकेटर अशी महेंद्रसिंग धोनीची आेळख आहे. परंतु आता त्याच्यावर टीका होताना  शाहिद आफ्रिदीने धोनीची पाठराखण केली आहे. आफ्रिदी म्हणाला की, “धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही नाही.” एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदी बोलत होता.

आफ्रिदीने धोनीची पाठराखण करतानाच पुढे म्हटले की, “धोनीचे भारतीय संघासाठीचे योगदान खूप मोठे आहे. त्याच्याइतके योगदान देणारे खूप कमी खेळाडू असतील. त्यामुळे कोणालाही धोनीला निवृत्त हो, असे सांगण्याचा अधिकार नाही. 2019 साली होणाऱ्या विश्वचषकासाठी धोनीला भारतीय संघात जागा मिळायला हवी.”

धोनीची बॅट योग्य वेळी न तळपल्यामुळे भारताने काही सामने गमावले आहेत. इतकेच नाही तर मागील काही सामन्यांचा आपण आढावा घेतला आणि त्यातील धोनीची कामगिरी पाहिली तर धोनी  सातत्याने अपयशी ठरत असल्याचेही दिसून येत आहे. याच कारणामुळे धोनीवर सर्व स्तरातून टीका होतानाही आपल्याला पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर माजी क्रिकेटर, समीक्षक आणि नेटीझन्सदेखील धोनीला वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट करत असल्याचेही निदर्शनास येत आहे.