‘या’ राज्यात प्रवासासाठी गरजेचा नाही E-Pass ! 14 दिवस क्वारंटाईनसुद्धा नाही

बंगळुरू : वृत्तसंस्था – लॉकडाऊनच्या 5 महिन्यानंतर आता कर्नाटकात ई पास किंवा 14 दिवस क्वारंटाईनची देखील आवश्यकता नाही. कारण आता येथील प्रवासी वाहतूक संबंधी सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवल्यानंतर आता राज्य गृह मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांचं अनुसरण केलं जात आहे.

आता सुधारीत प्रोटोकॉलनुसार, जे लोक कर्नाटकात येतील त्यांना प्रवेशासाठी सेवा सिंधू पोर्टलवर पास घेण्याची गरज भासणार नाही. तसंच कर्नाटकात सीमा, बस स्थानक, रेल्वे स्थानक, आणि विमानतळांवर वैद्यकीय तपासणीवर सुद्धा बंदी घातली आहे. आता कोणत्याही निर्बंधांशिवाय रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गानं कर्नाटकाला जाता येतं.

जर एखादा व्यक्ती कर्नाटकला आला आणि त्याच्यामध्ये कोणतीही लक्षणं नसतील तर तो 14 दिवस होम क्वारंटाईन न राहताही कामावर जाऊ शकतो किंवा बाहेरही फिरू शकतो. असं असलं तरी त्या व्यक्तीनं 14 दिवस स्वत:चं निरीक्षण करणंही गरजेचं आहे. जर काही लक्षणं दिसत असतील तर त्या व्यक्तीनं सेल्फ आयसोलेट होणं गरजेचं आहे. याशिवाय त्यानं सरकारी वैद्यकीय सल्लाही घेणं गरजेचं आहे. सरकारीआदेशात तसा उल्लेख आहे.

कर्नाटकातील लोकांना मूलभूत कोविड 19 च्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. यात मास्क लावणं, सोशल डिस्टेंसिंग पाळणं, साबण -पाणी किंवा सॅनिटायझरनं हात धुणं अशा गोष्टींचा समावेश आहे.

कर्नाटकातील कोरोनाच्या आकडेवारी बद्दल बोलायचं झालं तर सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 5851 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा 2,83,665 एवढा झाला आहे. मात्र या कालावधीत 8016 रुग्ण बरे झाले आहेत असंही आरोग्य विभागानं म्हटलं आहे. सोमवारी कोरोनामुळं 130 लोक दगावल्याची नोंद झाली आहे. राज्यात आतार्यंत 4810 लोकांनी आपला जीव गमावला आहे.