तब्बल 1 वर्षानंतर दिसली उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची पत्नी ! प्रेग्नंट असल्याची होती चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची पत्नी री सोल जू या एका वर्षांनंतर मीडियासमोर दिसल्या आहेत. एका कॉन्सर्टमध्ये त्या पती सोबत स्पॉट झाल्या. किम जोंग उन यांचे दिवंगत वडिल आणि उत्तर कोरियाचे माजी सत्ताधीश किम जोंग इल यांच्या जयंतीनिमित्त या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या वर्तमानपत्रात रोदोंग सिनमुन यांनी किम जोंग उन आणि त्यांच्या पत्नीचे काही फोटो प्रकाशित केले आहेत. री सोल जू या नेहमीच पतीसोबत सार्वजनिक कार्यक्रमात दिसत असतात. परंतु गेल्या वर्षी जानेवारीपासून त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आल्या नाहीत. यानंतर त्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

परंतु एका सदरच्या वृत्तपत्रानं त्या प्रेग्नंट असल्याची बातमी चुकीची असल्याची माहिती दिली आहे. इतकंच नाही तर या अफवेबद्दल रोषही व्यक्त केला आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेनं मंगळवारी सांगितलं की, री सोल जू यांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं सार्वजनिक ठिकाणी येणं टाळलं होतं. तसंच त्या मुलांसोबत वेळ घालवत होत्या. त्या एका वर्षापासून कुठेही न दिसल्यानं त्यांच्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्या आजारी पडल्याच्याही अफवा समोर आल्या होत्या. परंतु आता सर्व चर्चा अफवा ठरल्या आहेत.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनं सांगितलं की, री सोल जू किंना किम जोंग उन यंना तीन मुलं आहेत. त्यांच्याबद्दल खूपच कमी माहिती सार्वजनिक आहे. त्यांचे फोटोही कुठे जाहीर केले गेलेले नाहीत.

उत्तर कोरियात एकालाही कोरोनाची बाधा न झाल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण कोरियाई एजन्सीचं म्हणणं आहे की, कोरोना असल्याचा दावा नाकारता येत नाही. कारण चीन आणि उत्तर कोरिया यांचे जवळचे संबंध आहेत.

किम जोंग यांचे पत्नीसोबतचे कॉन्सर्टमधील जे फोटो समोर आले आहेत त्यात कोणीही मास्क लावला नसल्याचं दिसत आहे. त्यांच्या वडिलांच्या जयंतीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला. परंतु कोणीही कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीये.