‘आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी’, भाजपाकडून टीका

पोलीसनामा ऑनलाईन टीम : “दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे”, असं विधान जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून जोरदार समाचार घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबतचे जयंत पाटील यांनी वक्तव्य केल्यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आता महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. दरम्यान, भातखळकर हे ट्विटच्या माध्यमातून म्हणाले की “मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय, जयंत पाटीलांचा मोठा गौप्यस्फोट… आता महाविकास आघाडीतील फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची बाकी आहेत.”

यावर रोहित पवार यांनी दिले प्रतिउत्तर
जयंत पाटील यांच्या विधानाबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं असता, ”आपल्या हातातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतूने जयंत पाटील असं काही बोलले असावेत. जयंतराव यांचं त्यांच्या मतदारसंघासोबतच पूर्ण राज्यात मोठं काम आहे. लोकांना केंद्रबिंदू ठेवून जयंत पाटील राज्यभर फिरत असतात. मुख्यमंत्री म्हटलं की काम करताना आणखी ताकद मिळते”, अशी सावध प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली.