कामाची गोष्ट ! आता आजी-आजोबाही करू शकणार ‘पोस्टल’ बॅलेटनं मतदान, दिल्लीपासून सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज निवडणूक आयोगाने नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणूक आयोगाच्या पूर्वतयारीची माहिती दिली. इतकेच नाही तर टपाली मतदानाबाबत मोठा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. दिव्यांग आणि 80 वर्षांखालील ज्येष्ठ नागरिकांना टपाली मतदानाने मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

याआधी सर्वसामान्य माणसाला टपाली मतदानाची संधी मिळत नसे. परंतु आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मात्र दिव्यांग आणि 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना टपाली मतदान करणे शक्य होणार आहे. पूर्वी ठराविक विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सैन्यदल आणि पोलीस खात्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांनाच टपाली मतदानाची सुविधा दिली जात असे.

निवडणूक आयोगाने आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 8 फेब्रुवारी रोजी 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यापासून दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/