आता आधार कार्ड प्रमाणे प्रत्येक भारतीयाला मिळणार ‘युनिक हेल्थ आयडी’, तुम्हाला मिळतील ‘या’ सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने देशाच्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य नोंद ठेवण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन ( NDHM ) अंतर्गत आधार कार्ड प्रमाणे विशेष डिजिटल हेल्थ आयडीची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. मिशन अंतर्गत, जर एखाद्या भारतीय नागरिकास त्याचे हेल्थ आयडी घ्यायचे असेल तर त्याच्याकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही. दरम्यान, 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएचएम सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत देशातील रूग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा हेल्थ आयडीमध्ये जमा केला जाईल. यामुळे सहजपणे उपचारांची नोंद सुरक्षित राहते.

युनिक हेल्थ आयडीमध्ये मिळतील या सर्व सुविधा
हेल्थ आयडीमध्ये तुमच्या प्रत्येक आजाराची नोंद ठेवली जाईल. तसेच, तुम्ही किती वेळा डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे आणि उपचारादरम्यान तुम्हाला देण्यात आलेल्या औषधांची नोंददेखील या आरोग्य आयडीमध्ये असेल. पोर्टेबल असल्याने हे हेल्थ आयडी रूग्ण तसेच डॉक्टरांसाठीही उपयुक्त ठरेल. आपल्या हेल्थ आयडी कार्डमध्ये आधार आणि मोबाइल नंबरचा तपशील देखील असेल. हेल्थ आयडी कार्ड नंबर प्रत्येक व्यक्तीसाठी आधार नंबरसारखा युनिक असेल. एनडीएचएममध्ये आपला हेल्थ आयडी, डिजिटल डॉक्टर, आरोग्य सुविधा रेजिस्ट्री, वैयक्तिक आरोग्याची नोंद, ई-फार्मसी आणि टेलिमेडिसिनचा समावेश असेल. एवढेच नव्हे तर राज्यातील लोकांच्या आरोग्याच्या आकडेवारीच्या आधारे सरकारही चांगले आरोग्य कार्यक्रम करू शकतात. मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण यांनी म्हटले आहे की एनडीएचएम कार्यक्रमात चांगले आर्थिक परिणाम होतील.

पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सांगितले की, एनडीएचएम देशाच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती आणेल.

एनडीएचएम अंतर्गत एक लाखाहून अधिक युनिक हेल्थ आयडी तयार करण्यात आल्या आहेत. पथदर्शी प्रकल्प म्हणून सहा राज्यात ते सुरू झाले आहे.

एका अहवालानुसार डिजिटल हेल्थ मिशनमुळे देशातील जीडीपी वाढेल. येत्या 10 वर्षात जीडीपीमध्ये 250 अब्ज डॉलर्सची भर पडेल.

केंद्राने असे आश्वासन दिले आहे की सुरक्षा लक्षात ठेवून डिजिटल हेल्थ रेकॉर्ड पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

केंद्राच्या म्हणण्यानुसार या योजनेमुळे रूग्णाला चांगल्या सुविधा मिळतील आणि डॉक्टरांना योग्य उपचार मिळण्यास मदत होईल.