निर्भया केस : फाशीपासून वाचण्यासाठी दोषी ‘विनय’च्या वकीलांनी शोधली नवीन ‘पळवाट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 16 डिसेंबर 2012 साली घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 ही दोषींच्या विरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार 3 मार्चला सकाळी 6 वाजता चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे. परंतु फाशीपूर्वीच दोषींनी नवनव्या कायद्याच्या पळवाटा शोधण्यास सुरुवात केली आहे.

आता दोषी विनय कुमार शर्मा याचे वकील ए. पी. सिंह यांनी दावा केला आहे की तिहार जेलमध्ये त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याला डोक्याला मार लागला आहे. त्याने काही दिवस उपोषण देखील केले. एवढेच नाही तर तो मानसिक आजारातून जात आहे. अशात नियमानुसार त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. सुनावणी दरम्यान वकील ए. पी. सिंह यांच्या दावानंतर न्यायालयाने तिहार प्रशासनाला विनयवर लक्ष देण्यास सांगितले आहे.

यापूर्वी न्यायालयाने सुनावणी दरम्यान एपी सिंह यांनी एका दोषीसह लैंगिक शोषण झाल्याचा आरोप लावला होता. वकीलांनी दावा केला की दोषीबरोबर तुरुंगात लैंगिक शोषण झाले आणि त्याच्या साथीदारांना देखील असे करण्यास बळजबरी केली गेली.

तुरुंगात वाढवण्यात आली सुरक्षा –
डेथ वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर तुरुंग क्रमांक 3 ची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तुरुंग प्रशासनाच्या आदेशानंतरच बाहेरील व्यक्तीला आत येण्यास परवानगी दिली जात आहे. जर कोणाला तुरुंग क्रमांक 3 मध्ये जायचे असेल तर सुरक्षा कर्मचारी याची माहिती तात्काळ मुख्यालयाला देतात. यानंतर मुख्यालय आणि तुरुंग क्रमांक 3 च्या अधिकाऱ्यांची परवानगी मिळाली तरच प्रवेश दिला जात आहे.

3 मार्चला फाशी होण्याची शक्यता कमी –
3 मार्चला दोषींना फाशी होण्याची शक्यता कमी आहे. कारण दोषी पवनने आपली क्युरेटिव्ह याचिका अद्याप दाखल केलेली नाही. याशिवाय दोषी पवनकडे राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय देखील शिल्लक आहे. तसेच दोषी अक्षय देखील नव्याने दया याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे कारण त्यांनी याचिका दाखल करताना पुरेसे दस्तावेज जोडले नव्हते.

फाशीच्या 3 दिवस आधी बोलावण्यात येणार जल्लाद –
तिहार तुरुंग प्रशासनाच्या मते, 3 मार्चला फाशी देण्यात येणार असल्याने 29 फेब्रुवारीला मेरठमधील जल्लाद पवनला बोलावण्यात येईल. यापूर्वी ज्या पद्धतीने त्याला तिहारमध्ये ठेवण्यात आले होते, तसेच पुन्हा ठेवण्यात येईल. परिसरात असलेल्या कॅंटिंगमध्येच तो जेवण करेल.

तीन दिवसात फाशीची अंतिम तयारी होणार –
पवन जल्लाद यांच्या मते, ते कोणत्याही फाशीच्या 2 दिवसांपूर्वी तयारीला लागतात. यापूर्वी 1 फेब्रुवारीला फाशी होणार होती तेव्हा देखील पवन जल्लाद तुरुंगात पोहोचले होते परंतु त्यादिवशी फाशी टळल्याने त्याला परत जावे लागले होते. पवन जल्लाद यांनी सांगिलते होते की पुढील फाशीच्या तीन दिवस आधी त्यांना तिहार तुरुंगात बोलावण्यात येईल.