Coronavirus : दिलासादायक ! नव्या ‘कोरोना’बाधितांचे प्रमाण कमी

पोलीसनामा ऑनलाईन टीम नवी दिल्ली : दिवाळींनंतर देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र आता हि संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. दिवसभरात केवळ २२ हजार ०६५ नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच महिन्यांतील ही नीचांकी रुग्णसंख्या आहे. हे दिलासादायक चित्र असून आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडासा कमी झाला आहे.

जगात सर्वांत कमी मृत्युदर भारतात
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरातील काेराेना रुग्णसंख्या ९९.०६ लाखांपर्यंत गेली आहे, तर आतापर्यंत ९४.२२लाख रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात ३४ हजार ४७७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत काेराेनाच्या १५.५५ काेटी चाचण्या करण्यात आल्या असून, संक्रमणाचे प्रमाण घटून ६.३७ टक्क्यांवर आले आहे. काेराेनामुळे मंगळवारी देशभरात ३५४ मृत्यूंची नाेंद झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४३ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृत्युदर १.४५ टक्के असून, जगात
सर्वांत कमी मृत्युदर भारतात आहे. काेराेना रुग्णसंख्येमध्ये अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानी आहे. नव्या रुग्णांची संख्या घटत असल्यामुळे माेठा दिलासा मिळाला आहे. काेराेनाची साथ नियंत्रणात येत असली, तरीही लाेकसंख्येतील माेठ्या वर्गाला अजूनही धाेका असल्याचे आराेग्य मंत्रालयाने सांगितले.

ब्रिटनमध्ये काेराेनाच्या नव्या विषाणूने चिंता
युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यातून सावरत असताना ब्रिटनमध्ये काेराेना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने खळबळ उडाली आहे. नवा विषाणू झपाट्याने पसरताे. दक्षिण ब्रिटनमध्ये आतापर्यंत एक हजार रुग्ण सापडले आहेत. या भागात रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. काेविड १९ विषाणूमध्ये जनुकीय बदल झाले आहेत. परंतु, त्याचा धाेका किती आहे, हे स्पष्ट हाेण्यास वेळ लागणार आहे. दरम्यान, ‘फायझर’ कंपनीने तयार केलेल्या कोरोना लसीला सिंगापूरने मान्यता दिली असून, डिसेंबरच्या अखेरीस लस मिळण्याची अपेक्षा आहे.