जय महाराष्ट्र ! ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मंत्रालय अन् विधानभवन परिसरात लावावे’, भाजपच्या ‘या’ खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोलीसनामा ऑनलाईनः जाज्वल्य हिंदुत्वाचा विचार हिंदुस्थानातील कानाकोपऱ्यातल्या माणसांपर्यंत पोहचवणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मराठी माणसांच्या मनात आणि देशभरातील हिंदूंच्या ह्रदयात आजही अजरामर स्थान आहे. शिवसेनाप्रमुखांची येत्या 23 जानेवारीला जयंती आहे. त्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र मंत्रालय व विधानभवन परिसरात लावावे अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी (North Mumbai BJP MP Gopal Shetty) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना एका पत्राद्वारे केली आहे. दरम्यान भाजपाकडून शिवसेनेला सातत्याने हिंदुत्वाचे धडे दिले जातात. त्यातच भाजपा खासदाराने बाळासाहेबांच्या तैलचित्राचा मुद्दा उपस्थित केला आहे. खा. शेट्टी यांच्या पत्रावर राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया येते हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

याबाबत खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कांदिवली पश्चिम येथील पोयसर जिमखान्यात दि,23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संयुक्तपणे आपण स्वतः साजरी करत असतो. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीला मुख्यमंत्री ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली नसल्याने सोशल मीडियावर टीका केली होती. या श्रेणीत आपण स्वतःला जोडून घेत नाही हे त्यांनी स्पष्ट केले.

माजी पंतप्रधान वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय नेते मुंबईत आल्यावर मातोश्रीवर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटत असत. या दोन महान नेत्यांची भेट म्हणजे राष्ट्रीय विचारांचे मिलन असे कोट्यावधी राष्ट्रप्रेमींना वाटायचे. हिंदुत्व म्हणजे या गौरवशाली देशाची केवळ ओळखच नाही,तर या महान देशाचा श्वास,नाडी व आत्माच आहे. भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या पद व प्रतिष्ठेचा विचार न करता ,हिंदुत्व बळकट करण्यासाठी गेली 25 वर्षे प्रयत्नशील राहिले.

अटलबिहारी वाजपेयी हे हिंदुत्वाचे प्रतिकच होते तसेच ते प्रखर राष्ट्रप्रेमींचे अग्रणी मानले जातात. या नेत्यांचा सन्मान आज आपण सर्वांनी केला तर उद्याची पिढी या नेत्यांचा मान सन्मान राखतील असे खासदार शेट्टी यांनी पत्रात शेवटी नमूद केले.