अबब ! नव वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक बालकांचा जन्म

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात जगभरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. भारतात नववर्षाच्या पहिल्या दिवशी ६९ हजार ९४४ बालकांनी जन्म घेतला असून हा आकडा जगात सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंडने (युनिसेफ) एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. भारतापाठोपाठ चीनमध्ये १ जानेवारी रोजी ४४ हजार ९४० बालक जन्माला आले आहेत. तर नायजेरियामध्ये २५ हजार ६८५ बालकांनी जन्म घेतला असल्याचे युनिसेफच्या अहवालात म्हटले आहे. जगात जन्म घेतलेल्यांपैकी तब्बल १८ टक्के बालकांनी भारतात जन्म घेतला आहे.

भारत सरकारने लोकसंख्या कमी करण्यासाठी सातत्याने घेतलेल्या उपक्रमाला नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे या अहवालावरुन दिसून येत आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारताने जन्मदरात चीनला मागे टाकले आहे. अशाच पद्धतीने ही लोकसंख्या वाढत गेली तर काही वर्षात भारत लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकेल.

२०१९ मध्ये युनिसेफच्या बालहक्क करार स्वीकाराचा तिसावा वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने युनिसेफच्यावतीने जगभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात  येणार आहेत. या कराराअंतर्गत प्रत्येक मुलाला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल.

युनिसेफच्या कार्यकारी उपसंचालक पेट्री गॉर्निज्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण प्रत्येक मुलाला जन्मानंतर जगण्याचा हक्क बहाल करण्याचा संकल्प करायला हवा. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात  एकूण ३ लाख ९५ हजार ७२ बालकांचा जन्म झाला. यांपैकी ९८ हजार ७६८ मुले ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत. पाकिस्तानमध्ये १ जानेवारी रोजी १५ हजार ११२ तर बांगलादेशमध्ये ८ हजार ४२८ बालकांचा जन्म झाला आहे.