कामाची गोष्ट ! तुमच्या बँक अकाऊंटमध्ये ऑनलाईन फ्रॉड झाल्यास तात्काळ ‘हे’ काम करा, परत मिळतील तुमचे पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाच्या संकट काळामध्ये नागरिकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. याचाच फायदा घेऊन ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या लोकांकडून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहे. सायबर गुन्हेगार फ्रॉडसाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन पोलिसांनी ऑनलाईन बँक फ्रॉड झालेल्यांच्या मदतीसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर काही मिनिटात फ्रॉडद्वारे गेलेली आपली रक्कम आपल्याला परत मिळण्यास मदत होणार आहे.

कोणत्या क्रमांकावर संपर्क साधायचा ?

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यासाठी 155260 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने केंद्रीय गृह मंत्रालयसह मिळून या हेल्पलाईन क्रमांकाला अधिक सक्षम बनवण्यासाठी पायलट बेसिसवर काम सुरु केले होते. दिल्ली पोलिसांनी यात आणखी 10 लाईन्स जोडल्या आहेत. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अनेश रॉय यांनी सांगितले की, यामुळे जवळपास 23 लोकांना त्यांचे फ्रॉडमध्ये गेलेले पैसे परत मिळाले आहेत. 23 लोकांना जवळपास 8.11 लाख रुपये परत करण्यात आले आहेत. यामध्ये सगळ्यात मोठी रक्कम दिल्लीत राहणाऱ्या एका रिटायर्ड ऑडिट अकाउंट ऑफिसरची होती. त्यांच्या खात्यामधून सायबर गुन्हेगारांनी 98 हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर करुन घेतली होती.

या प्रकारे होते काम

केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलद्वारे 155260 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. तुमचे पैसे ज्या खात्यातून किंवा ज्या आयडीवर ट्रान्सफर करण्यात आले होते, त्या बँकेला किंवा ई-साईटला अलर्ट मेसेज पाठवला जातो. त्यानंतर तुमची रक्कम होल्ड केली जाते.

फ्रॉड झाल्यावर काय करायचे ?

– जर तुमच्या सोबत ऑनलाईन फ्रॉड झाला, तर तुम्ही सर्वप्रथम हेल्पलाईन क्रमांक 155260 या क्रमांकावर कॉल करावा. त्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, फ्रॉड झाला त्यावेळचं टायमिंग, बँक अकाउंट नंबर मागितला जाईल.

– तुमच्याकडून सर्व माहिती घेतल्यानंतर हेल्पलाईन नंबर तुमची माहिती पुढील कारवाईसाठी पोर्टलवर पाठवते. तसेच संबंधित बँकेला फ्रॉड बाबतची माहिती दिली जाते. माहिती वेरिफाय झाल्यानंतर फ्रॉड झालेली रक्कम होल्ड केली जात. त्यानंतर तुमची रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते.