मुख्यमंत्री कोरोना निधीचा फक्त 25 टक्केच वापर

पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड-१९ असे खाते बँकेत उघडून त्यात देणगी देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यात ३ ऑगस्टपर्यंत ५४१ कोटी १८ लाख ४५ हजार ७५१ रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. त्यातील केवळ १३२ कोटी २५ लाख ८९ हजार ६१० रुपयांचा (२४. ४३) खर्च झाल्याची बाब माहिती अधिकाराच्या मार्फत उघड झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या खात्यात जमा झालेली रक्कम आणि वाटप केलेल्या रकमेचा तपशील मागितला होता. त्यावरती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, शासनाने हे स्वतंत्र खाते २८ मार्च २०२० रोजी सुरु केले. त्यात १५ जून २०२० पर्यंत ४२७ कोटी २८ लाख २४ हजार २३ रुपयांच्या देणग्या मिळाल्या. ३ ऑगस्टपर्यंत ही रक्कम वाढून ५४१ कोटी १८ लाख ४५ हजार ७५१ रुपये झाली. यातील फक्त १३२ कोटी २५ लाख ८९ हजार ६१० रुपयांचा खर्च करण्यात आला.

या निधीतून राज्यातील मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाला २० कोटी रुपये देण्यात आले. तर ३.८२ कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला देण्यात आले. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर झाले होते. यादरम्यान औरंगाबाद येथे १६ मजुरांचा अपघातात मृत्यू झाला होता. या मजुरांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख प्रमाणे ८० लाख रुपये या खात्यातून दिल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले.

३६ जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांचे रेल्वे भाडे ८८.६४ कोटी रुपये दाखवण्यात आले. रत्नागिरी आणि जालना येथे कोविड-१९ चाचणी केंद्रासाठी प्रत्येकी १.०७ कोटींचा निधी यामाध्यमातून देण्यात आला. तर कोविड-१९ रुग्णांच्या रक्तद्रव्य (प्लाझ्मा) उपचारांसाठी १६.८५ कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण विभागास दिले गेल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, कोरोना मुळे शासन आर्थिक अडचणीत असल्याचे वेळोवेळी सांगण्यात येते. पण त्यानंतरही या खात्यातून केवळ २४.४३ टक्केच खर्च झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.