Pimpri News : विरोधकांचा खोटा दावा, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष : देवेंद्र फडणवीस

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. विरोधकांचा हा दावा खोडून काढत राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने जास्त जागांवर विजय मिळवला असून विरोधकांचा हा दावा खोटा असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत तिन पक्ष एकत्र मिळून लढले असले तरी भाजपच मोठा पक्ष ठरल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे.

भाजपच्या अनुसूचित जानजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात पार पडली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री अशोक उईके, माजी मंत्री ओमप्रकाश दुर्वे, खासदार भारती पवार, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, वैभव पिचड उपस्थित होते.

दोन जणांच्या कोचवर तिघे बसले हे सरकार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्याचे सरकार तीन पक्षांचे आहे. दोन जणांसाठी असलेल्या कोचवर तिघे बसले असल्याचा टोला त्यांनी यावेळी राज्यातील आघाडी सरकारला लगावला. ते पुढे म्हणाले की, या तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला आहे. निवडणुकीत तिघे एकत्र आले तर काय होईल ? असा प्रश्न विचारण्यात येत होते. राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. तिघे एकत्र येऊनही भाजपच मोठा पक्ष ठरला असल्या दावा त्यांनी यावेळी केला. तसेच विरोधकांनी केलेला दावा खोटा असल्याचे सांगितले.

बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आदिवासी दिवस म्हणून साजरा करा
आदिवासींनी जल, जंगल आणि जमीन संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संस्कृती त्यांनी उभारली. मात्र, इंग्रजांनी विरोधी कायदे करीत त्यांना उपेक्षित केले. काही जमातींना तर त्यांनी गुन्हेगार ठरवले. त्या विरोधात बिरसा मुंडा यांनी संघर्ष करुन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस आदिवासी दिवस म्हणून साजरा करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

माल खरेदी केल्याने त्यांना माल मिळतो
आमच्या सरकारने अनेक कल्याणकारी योजना तयार केल्या होत्या. त्या योजना या सरकारने बंद करण्याचा घाट घातला आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर आम्ही पैसे जमा करीत होतो. मात्र, सध्याचे सरकारला खरेदीचा शौक आहे. कारण माल खरेदी केल्यास त्यांना माल मिळतो अशी टीका त्यांनी केली.