निरव मोदीचा बंगला पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींना चुना लावून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या किहीम समुद्र किनाऱ्यावरील नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दिले आहेत.

अलिबागमधील किहीम गावात नीरव मोदीचा तर मेहुल चोक्सीचा आवास गावात बंगला आहे. हे बंगले उभारताना महसूल आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले होते. अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई का केली नाही, असा सवाल १ आॅगस्टला मुंबई उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना केला होता. अलिबागमध्ये नीरव मोदीसह इतरांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली होती. न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

नीरव मोदीसह मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागात आहेत. अलिबागमध्ये ६९ आणि मुरुडमध्ये ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये नीरव मोदीच्या बंगल्याचाही समावेश आहे. तर अनेक सेलिब्रेटींचेही बंगले या यादीत आहेत. कलम १५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामध्ये १ लाख रुपये दंडापासून ५ वर्षे कैद अशी शिक्षेची तरतूद आहे.