पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमात मराठा आरक्षण अध्यादेशाला आव्हान ; उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सोमवारी राज्याचे महाअधिवक्ता, राज्य सरकार व सीईटी सेलला कोर्टाने नोटीस बजावली असून १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.

पदव्युत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमात मराठा आरक्षण यंदा लागू नाही. असा निर्णय नागपूर खंडपीठाने कायम ठेवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तो कायम ठेवला. त्यानंतर राज्य सरकारने यासंदर्भात अध्यादेश काढला आहे. त्या अध्यादेशानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे झालेले प्रवेश कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना यावर सुनावणी करण्यास नकार देत विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्यासोबतच यावर लवकर सुनावणी करून निर्णय घ्यावा असा आदेश दिला.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सोमवारी अवकाशकालीन न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. त्यावेळी राज्याचे महाअधिवक्ता, राज्य सरकार, सीईटी सेलला न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तसेच १० जून पर्यंत या नोटीशीवर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.