उस्मानाबाद पोलिसांनी चोरीच्या 12 जलसिंचन विद्युत पंपासह आरोपीच्या आवळल्या मुसक्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही महिन्यांत तुळजापूर तालुक्यातील विहीरी, कुपनलीका, शेततळे यांतील जलसिंचनाचे विद्युत पंप, स्टार्टर, केबल चोरीस जाण्याचे सत्र सुरु झाल्याने ऐन उन्हाळ्यात जलसिंचनाची अडचण निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला होता. या सर्व पंप चोरीची कार्यपध्दती व कार्यक्षेत्र पाहता पोलीसांच्या असे लक्षात आले की, बहुतांशी विद्युत पंप हे रात्रीच्या वेळी तुळजापूर, तामलवाडी व नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील गांव शिवारातून चोरीस गेले आहेत. त्या दृष्टीने पोलीसांनी तुळजापूर तालुक्यातील खबऱ्यांना तसेच ग्राम सुरक्षा दलांना सतर्क करुन जुने जलसिंचन पंप विक्री करणारा कोणी ईसम तालुक्यात आहे काय ? याची माहिती घेण्यास सांगीतले.

पोलीसांच्या प्रयत्नांना यश येउन खबऱ्याने माहिती दिली की, “तुळजापूर तालुक्यातील खडकी तांडा येथील कैलास गोपाळ चव्हाण, वय 49 वर्षे हा गेल्या काही महिन्यांपासुन जुन्या जलसिंचन पंपांचा विक्री व्यवसाय करु लागला आहे.” यावर स्था. गु. शा. च्या पोनि- गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, साळुंके, पोना – दिपक लाव्हरे पाटील, पोकॉ- अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, बलदेव ठाकुर, माने, चौरे यांच्या पथकाने कैलास चव्हाण याच्यावर पाळत ठेवली. जलसिंचन पंप खरेदी करण्याच्या बहान्याने अनेक बनावट शेतकरी ग्राहक कैलास चव्हाण याच्याकडे पोलीसांनी पाठवले असता पोलीसांची खात्री झाली की तो स्वस्त दरात चोरीचे जलसिंचन पंप विकण्याच्या प्रयत्नात आहे. यावरुन पथकाने आज दि. 25 मे रोजी त्यास राहत्या घरुन ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात 12 जलसिंचन पंप आढळले. या पंपाच्या ताब्या विषयी तो समाधानकारक माहिती देत नसल्याने पोलीसांनी गुन्हे अभिलेख तपासले असता निदर्शनास आले की नमूद 12 पंप हे तुळजापूर तालुक्यातून चोरी केलेले असून त्यावरुन तामलवाडी पो.ठा.- 9, नळदुर्ग पो. ठा.- 2, तुळजापूर पो. ठा. – 1 असे एकुण 12 गुन्हे दाखल आहेत.

यावरुन पथकाने त्यास नमूद 12 पंप व चोरी करण्यास वापरलेली मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. पोलीस पथकाने केलेल्या या यशस्वी कामगीरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी अभिनंदन केले आहे.