२६ वर्षानंतर किल्लारीला पुन्हा भूकंपाचा धक्का ; परिसरात घबराटीचे वातावरण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पुन्हा एकदा किल्लारीसह परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या धक्क्यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. किल्लारीसह हत्तरगा, सांगवी, जेवरी, येळवट, सिरसल, तळणी आदी गावांना हा धक्का जाणवला. दुपारी हा धक्का जाणवला. ऐनथंडीच्या दिवसांत पुन्हा एकदा रात्र घराबाहेर जागून काढावी लागेल, अशा चर्चेला यामुळे उधाण आले आहे. अनेक महिन्यांनंतर पुन्हा धक्का जाणवल्याने या भूकंपप्रवण क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. हा धक्का किती रिश्टर स्केलचा झाला, हे अद्याप समजले नाही. कारण तशी व्यवस्था किल्लारीत कार्यरत नाही.

तर उस्मानाबाद जिल्ह्यात गूढ आवाजाचे सत्र सुरूच आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यातील काही भागात गूढ आवाज येऊन जमीन हादरली. त्यामुळे भूकंपाच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली असता हा भूकंप नसल्याचे सांगण्यात आले. उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यातील काही भागांत सोमवारी सकाळी ११.५७ वाजेच्या सुमारास मोठा गूढ आवाज आला. या आवाजामुळे जमीन हादरली. घरातील सेल्फमधील भांडे, दारे, खिडक्यांची तावदाने थरारली. काही नागरिकांनी तर भूकंप झाल्याच्या भीतीने घराबाहेर धाव घेतली. यानिमित्ताने सन १९९३ च्या प्रलयंकारी भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. जो तो आवाज कशाचा? अशी विचारणा करीत होता. परंतु आवाजाबाबत कोणालाच काही सांगता येत नव्हते.

उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा शहरासह काटी, सावरगाव, माकणी, करजगाव, राजेगाव, सास्तुर, होळी आदी गावांत गूढ आवाज जाणवला. आवाजासंदर्भात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता हा भूकंप नाही, असे सांगण्यात आले. आवाज नेमका कशाचा? याचे ठोस उत्तर कोणीच सांगू शकले नाही. गत काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्याची लातूर येथील भूकंपमापक यंत्रावर नोंद झाली होती. आवाजाची मात्र नोंद नाही. त्यामुळे हा भूकंप नसल्याचे आपत्ती निवारणच्या अधिकारी वृक्षाली तेलोरे यांनी सांगितले.

१० टक्के आरक्षणाचा आर्थिक दुर्बल घटकाला फायदा : श्वेता शालिनी