आयएएस अधिकाऱ्यासह ओवेसींची बुलेट राईड तेही विनाहेल्मेट

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन – देशात लोकसभा निवडणुकीचा विषय हा चर्चेचा आहे. त्यातही एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे. छायाचित्रात ओवेसी हे आयएएस अधिकाऱ्याबरोबर हेल्मेट न घालात बुलेटवर जाताना दिसत आहेत. हे छायाचित्र मागील आठवड्यातील असून सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. त्यामुळे ओवेसींसोबत असणारे हे आयएएस अधिकारीही चर्चेत आले आहेत.

छायाचित्रात ओवेसींच्या मागे बसलेल्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव अरविंद कुमार आहे. अरविंद कुमार हे तेलंगणा सरकारअंतर्गत येत असलेल्या महापालिका प्रशासकीय विभागाचे प्रमुख सचिव आहेत. ओवेसी आणि अरविंद कुमार हे हैदराबाद शहरातील पालिका कार्यालयांना भेटी देण्यासाठी जात होते. त्यावेळी दोघांनीही हेल्मेट परिधान केले नव्हते. त्या गाडीचा क्रमांक AP 12 L 4000 असा आहे.

दरम्यान, बुलेटवरचे त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आयएएस अधिकारी अरविंद कुमार एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी हेल्मेट परिधान न केल्यामुळे आपण तेलंगणा वाहतूक पोलिसांकडे १३५ रूपये दंड भरल्याचे सांगितले आहे. एवढेच नाहीतर दंड भरल्याची पावतीही त्यांनी शेअर केली आहे.