ऑनर किलिंग ! परजातीच्या बॅचमेटवर प्रेम करणाऱ्या मुलीचा बापानेच गळा घोटला

विजयवाडा : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीचे तिच्याच वर्गात असलेल्या दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाल्याने संतापलेल्या बापाने २० वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर बापाने नातेवाईकांपासून हा प्रकार लपवून ठेवत तिला हृदय विकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र, नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलवून घेतले. मृत मुलीचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.

वैष्णवी असे खून झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव असून के. वेंका रेड्डी असे आरोपी बापाचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी (दि.४) घडला आहे.
आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील कोट्टापेलम या ठिकाणची ही घटना असून मृत मुलगी बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकते. तिच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती वैष्णवीच्या बापाला मिळाली. मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याने वेंका रेडेडी यांना राग अनावर झाला. यातूनच त्यांनी वैष्णवीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर त्याने नातेवाईकांना वैष्णवीच्या मृत्यूची माहिती दिली.

नातेवाईकांनी वैष्णवीच्या मृत्यूचे कारण विचारल्यावर त्याने हृदयविकाराने वैष्णवीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु नातेवाईकांना वेळीच संशय आल्याने त्यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांनी वैष्णवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्याचा अहवाल मागवला. अहवालात वैष्णवीचा मृत्यू हृदयविकाराने नाही तर गळा आवळून खून केल्याचे समोर आले.

वैष्णवी ही कोट्टापेलम येथील एका खासगी महाविद्यालयात शिकते. दरम्यान, वैष्णवी आपल्या वर्गात शिकणाऱ्या एका मित्राच्या प्रेमात पडली होती. मागील दोन वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाविषयी तिच्या घरच्यांना आठ महिन्यापूर्वी समजले होते. माहिती मिळताच घरच्यांनी मुलाची चौकशी केली. त्यावेळी तो दुसऱ्या जातीचा असल्याची माहिती तिच्या घरच्यांना मिळाली. त्यामुळे तिच्यावर वेगवेगळी बंधने घालण्यात आली होती.

या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता, वैष्णवी २ फेब्रुवारी रोजी घरातून पळून गेली होती. तसेच आपल्या प्रियकरासोबत विवाह करण्यासाठी वैष्णवी आणि तिचा प्रियकर मरकापुरम जिल्ह्यात पोहचले. परंतु वैष्णवीच्या पालकांनी तिचा शोध घेऊन तिला पुन्हा घरी आणले होते. घरी आल्यानंतर वडील आणि वैष्णवी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात रेड्डी याने आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला. या घटनेच्या आगोदर प्रकाशम जिल्ह्यामध्ये ऑनर किलिंगच्या घटना घडल्या होत्या. प्रकाशम जिल्ह्यात घडलेली ही चौथी घटना आहे.