वडीलांना पद्मश्री पुरस्कार फार उशीराने मिळाला : सरफराज खान

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडचे जेष्ठ कलाकार कादर खान यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देण्याचे जाहीर केले .पण या पुरस्काराला स्वीकारण्यासाठी आज कादर खान या जगात नाही. कादर खान यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३०० पेक्षा जास्त सिनेमात काम केले असून, त्यांनी आपल्या कार्याने हिंदी सिनेसृष्टीला अमूल्य योगदान दिले आहे. पण त्यांना हा सन्मान स्वत:च्या हातांनी स्वीकारता येणार नसल्याची खंत त्यांच्या मुलाला वाटते .

एका मुलाखतीत सरफराजने सांगितले, ‘खूप चांगली गोष्ट असती जर माझे वडील हा पुरस्कार स्विकारण्यासाठी हयात असते. देवाला फक्त चांगली माणसे आवडतात आणि तो त्यांना बोलावण्यासाठी कोणता तरी मार्ग काढतो.’ सरफराजच्या मते त्याच्या वडीलांना पद्मश्री पुरस्कार फार उशीराने मिळाला.

वडिलांच्या मृत्यूनंतर सरफराजने बॉलिवूडवर निराशा व्यक्त केली होती. कॅनडाला गेल्यानंतर सगळ्या बॉलिवूड कलाकारांनी कादर खान यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या एकाही मित्राने त्यांना एक फोन सुद्धा केला नाही. असे वक्तव्य अभिनेता कादर खान यांचा मुलगा सरफराज याने केले होते.

कादर खान यांनी १९७३ साली ‘दाग’ चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. तसेच त्यांनी आपल्या कारकीर्दीत ३०० हून अधिक सिनेमात काम केले.आणि २५० हून अधिक सिनेमांसाठी संवाद लिहिले आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षी कॅनडातील एका रुग्णालयात कादर खान यांनी आखेरचा श्वास घेतला होता.