पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा, म्हणाले – ‘भारत आणखी एका सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत’

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. यावरून असं दिसत आहे की, यापूर्वी भारतानं जो सर्जिकल स्ट्राईक केला हता त्याची भीती अजूनही त्यांची मनातून गेली नाही. शुक्रवारी दुबईत पाकचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) यांनी असा दावा केला आहे पाकिस्तानकडे भारताच्या पुढील सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे आहेत.

याबाबत बोलताना कुरेशी यांनी सांगितलं, मला गुप्तचर सूत्रांकडून समजलं आहे की, भारत पाकिस्तान विरोधात सर्जिकल स्ट्राईकचा प्लॅन तयार करत आहे. ही एक गंभीर बाब आहे. मला याचीही माहिती आहे की, भारतानं यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे. भारत त्यांना भागिदारही मानतो. भारतात वाढत असलेल्या अंतर्गत मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी अशा प्रकारचा प्लॅन आखला जात आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कुरेशी म्हणाले की, आम्ही जगाला सांगू इच्छितो की, शांतता ही सामूहिक जबाबदारी आहे. भारत त्यांच्या देशातील अंतर्गत मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्हाला स्थिर करण्यासाठी हालचाल करत आहे. आमची विनंती आहे की, जगानं त्यांना तसं करण्यापासून रोखावं.

दरम्यान पाकनं अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पाकमधील वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्युटनं अशा प्रकारचं वृत्त दिलं होतं.