पाकिस्तानने 4 दहशतवाद्यांना केली ‘अटक’ ! FATF कडून ‘ब्लॅकलिस्ट’ होण्याच्या भीतीमुळे नवे नाटक ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारी पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणांनी लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावाच्या दहशतवाद्यांना दहशतवाद निधीच्या (टेरर फंडिंग) आरोपाखाली अटक केली. त्याचबरोबर पाकिस्तानचे म्हणणे आहे की आता लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावाच्या या दहशतवाद्यांविरूद्ध खटला चालवला जाईल. पॅरिस येथे होणाऱ्या फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने जगाला दाखवण्यासाठी काही दहशतवाद्यांना अटक केली असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावा या दहशतवाद्यांची ओळख प्राध्यापक जफर इकबाल, याह्या अजीज, महंमद अशरफ आणि अब्दुल सलाम अशी आहे. दहशतवाद्यांविरूद्ध पाकिस्तानची ही कारवाई नेमकी एफएटीएफच्या बैठकीपूर्वी समोर आली आहे.

FATF ने पाकिस्तानला टाकले आहे ग्रे लिस्टमध्ये :
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान एफएटीएफची बैठक होणार आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवणे आणि प्रोत्साहन देणे यामुळे एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये टाकले आहे. आता एफएटीएफ पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याच्या विचारात आहे. यामुळे पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे. हे टाळण्यासाठी तो दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे नाटक करीत आहे.

लाहोरच्या कोट लखपत जेलमध्ये हाफिज :
काउंटर टेररिझम डिपार्टमेंट (सीटीडी) च्या प्रवक्त्याने सांगितले की बंदी घातलेल्या जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुख अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना सीटीडी पंजाबने टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. सीटीडीने सांगितले की लश्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावाचा नेता हाफिज सईद आधीच लाहोरच्या कोट लखपत तुरूंगात बंद आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याला १७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याविरूद्ध खटला चालविला जात आहे.

आर्थिक मदत म्हणून दहशतवाद्यांना अटक कशी केली ?
सीटीडीने म्हटले आहे की, गुरुवारी अटक झालेल्या दहशतवाद्यांनी टेरर फंडिंगच्या माध्यमातून मोठी मालमत्ता निर्माण केली आहे. आता टेरर फंडिंग देणाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू आहे. या दहशतवाद्यांनी अल अंफाल ट्रस्टसारखे विश्वस्त ट्रस्ट स्थापन केले आहेत, ज्यामार्फत निधी पुरवठा केला जात असे. सीटीडीने सांगितले की सरकारने दहशतवाद्यांची संपत्ती जप्त केली आहे. आता अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना शुक्रवारी कोर्टात हजर केले जाईल.

visit : policenama.com