पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात ‘हे’ मोठे बदल : या दोन मोठ्या खेळाडूंची वापसी

लाहोर : वृत्तसंस्था – विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच संघानी यासाठी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. सर्वांनी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा देखील केली आहे. यातच आता इंग्लंडमध्ये दणकून पराभव स्वीकारावा लागल्याने पाकिस्तानने त्यांच्या विश्वकप संघात दोन महत्वपूर्ण बदल केले आहेत. पाकिस्तान संघाच्या निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल हक यांनी सोमवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचा १५ जणांचा अंतिम संघ जाहीर केला आहे.

याआधी संघात समावेश असलेल्या जुनैद खान व फहीम अशरफ यांना डच्चू देण्यात आला आहे. तर, मोहम्मद आमीर व वाहब रियाज यांचा समावेश करण्यात आला आहे. याविषयी निवड समिती प्रमुख इंजमाम उल हक यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, इंग्लंडमध्ये झालेल्या पराभवानंतर आम्हाला संघात मोठे बदल करावे लागले. संघात आमीर व रियाज या अनुभवी शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. त्यांना न घेऊन आम्ही फार मोठी चूक केली असती,”अशी कबुली इंजमाम उल हकने दिली. या दोघांबरोबरच इंग्लंडविरुद्ध खेळत असलेल्या संघात समावेश असलेल्या असिफ अलीला मात्र वर्ल्डकप संघात स्थान देण्यात आलेले नाही.

दरम्यान, वहाब रियाझ याने शेवटचा एकदिवसीय सामना हा दोन वर्षांपूर्वी भारताविरोधात खेळला होता. त्यामुळे आता विश्वकपमध्ये तो कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून असणार आहे. त्याचबरोबर मोहम्मद आमीर याच्यादेखील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.