अफगानिस्तानचे माजी राष्ट्रपती करजई यांनी दिली धमकी, म्हणाले – ‘पाकिस्ताननं शिस्तीत रहावं अन्यथा वाईट परिणाम होतील’

काबुल : अफगाणिस्तान सध्या पाकसाठी कठोर भूमीकेत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या गाळीबारात 22 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करजई यांनी म्हटले आहे की, आता पाकिस्तानने शिस्त शिकली पाहिजे. पाकिस्तानला सभ्यता आणि मित्रत्वातील वागणे शिकावे लागेल अन्यथा येणारा काळ त्यांच्यासाठी खुप वाईट असू शकतो. करजई यांनी यापूर्वी देखील आरोप केला होता की, अफगाणिस्तानमध्ये दशहतवाद पसरवण्यामागे पाकिस्तानच जबाबदार आहे.

करजई यांनी काही महिन्यापूर्वी म्हटले होते की, अफगाणिस्तानमध्ये बहुतांश दहशतवादी हल्ले पाकिस्तानच्या आश्रयाने होतात. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा करजई यांच्या वक्तव्याचे पूर्ण समर्थन केले आहे. करजई यांनी शुक्रवारी पाकिस्तान बॉर्डरवर झालेल्या फायरिंगवर नाराजी व्यक्त करत म्हटले की, ईदच्या अगदी अगोदर घडलेल्या या घटनेने दोन्ही देशांचे संबंध आता खालच्या पातळीवर पोहचत आहेत. करजई यांनी पाकिस्तानला धमकी देत म्हटले की, त्यांनी आता आपल्या शेजार्‍यांशी विशेषता अफगाणिस्तानशी संबंध सुधारले पाहिजेत. त्यांना सभ्यता शिकावी लागेल आणि मित्रत्वाचे नाते ठेवावे लागेल.

दहशतवादी घटना थांबेनात
अफगाणिस्तानच्या जलालाबाद जेलमध्ये रविवार रात्री उशीरा दोन स्फोट झाले. टोलो न्यूजनुसार, जेलच्या जवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीत बसलेल्या आत्मघातकी दहशतवाद्याने स्वताला उडवले. यानंतर जेलमध्ये फायरिंगचा आवाज ऐकू येऊ लागला. रिपोर्टनुसार, नंगरहार प्रांतातील जलालाबाद जेलच्या एंट्री गेट पीडी4 वर आत्मघाती हल्लेखोराने कारमध्ये स्फोट केला.

रिपोर्टनुसार, जेलच्या वरच्या मजल्यावर दहशतवादी दाखल झाले होते. नंगरहार प्रांताच्या गव्हर्नरच्या प्रवक्त्याने म्हटले की, हल्लेखोरांनी जेलच्या जवळील बाजारात पोझिशन घेतली होती. यादरम्यान त्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने न्यूज एजन्सी एएफपीला सांगितले, हा हल्ला आम्ही केला नाही. 12 मेरोजी याच प्रांतात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 32 लोकांचा मृत्यू झाला होता.

सीमेवर वाढला तणाव
तिकडे पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर खुप तणाव आहे. अफगाणिस्तानचा आरोप आहे की, पाकिस्तानचे लष्कर त्यांच्या निष्पाप लोकांवर विनाकारण फायरिंग करत आहे, ज्यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.

इमरान खान सरकारचे मंत्री शिबली फराज यांनी म्हटले की, – आम्हाला तणाव नकोय, परंतु जर दुसरीकडून फायरिंग होत असेल तर पाकिस्तानचे लष्कर उत्तर देणार. सध्या अमेरिकेने या सर्व प्रकरणावर तोंड बंद ठेवले आहे, परंतु अमेरिकेलाही माहिती आहे की पाकिस्तानी लष्कर अफगाण तालिबान आणि विशेषता हक्कानी नेटवर्कला मदत करत आहे.