काश्मीर मुद्यावरून पुन्हा इम्रान खानची ‘बडबड’, होऊ शकतो ‘नरसंहार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीर मधील कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तानची चांगलीच झोप उडाली आहे. त्यामुळेच पाककडून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न अनेकदा केला गेला. मात्र इम्रान खान यांची प्रत्येक वेळी निराशा झाली. संयुक्त राष्ट्र आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा पाकिस्तानला थेट मदत करण्याची इच्छा दाखवली नाही.

न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकांशी बोलताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा आपले रडगाणे व्यक्त करत काश्मीरमध्ये मोठा नरसंहार होणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले काश्मीरात जसा कर्फ्यू काढला जाईल तसा मोठा नरसंहार होईल. तसेच याबाबत संयुक्त राष्ट्र आमचे ऐकणार नाही तर मग कोण ऐकणार.

मान्य केला पराभव
इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली हार मान्य केल्याचे दिसत आहे. कारण संयुक्त राष्ट्र आणि इतर कोणताही देश त्यांची मदत करण्यासाठी तयार होताना दिसत नाही. त्याबाबत इम्रान म्हणतात, मी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून निराश झालेलो आहे. जर 80 लाख यूरोपीय किंवा यहूदी एवढेच नाही तर आठ अमेरिकनला बंदिवासात ठेवले असते तरी पण आपण हीच प्रतिक्रिया दिली असती का ? असा सवाल इम्रान खान यांनी उपस्थित केला आहे.

इम्रान यांचा युटर्न
या आधी अमेरिकेच्या राष्ट्रपतींना भेटताच इम्रान यांचे सूर बदलले होते. काही दिवसांआधी भारताला सतत युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने नंतर सांगितले होते की ते आता आम्ही भारतासोबत युद्ध करू इच्छित नाही. हे वक्तव्य इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या द्विपक्षीय बैठकीनंतर केले होते.