कोरोना संकटामुळे पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तरला भारताची चिंता, म्हणाला…

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला देशाची अवस्था बिकट आहे. आता या कठीण प्रसंगात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरलाही भारताची चिंता वाटू लागली आहे. शोएबने आपली चिंता व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली असून त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

शोएबने व्हिडीओत म्हटले आहे की, सध्या भारताची अवस्था बिकट बनली आहे. महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली आणि भारताच्या अनेक राज्यातून दिवसाला कोरोनाचे लाखो रुग्ण सापडत आहेत. याला आटोक्यात आणणे हे कोणत्याही सरकारला सध्या शक्य नाही. सध्या भारताला ऑक्सिजनची सर्वात जास्त गरज आहे. त्यामुळे यावेळी आपण एकमेकांना सहकार्य करायला हवे. मी पाकिस्तानच्या सरकारलादेखील ही गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे या कठिण प्रसंगात आपण एकमेकांना मदत करणे गरजेचे असल्याचे तो म्हणाला. दरम्यान आतापर्यंत शोएबला बऱ्याचदा भारतीयांनी ट्रोल केले आहे. पण या कठीण काळात तो भारतीयांना पाठींबा देण्यासाठी पुढे आल्याचे पाहयला मिळत आहे.