पालघर पोटनिवडणूक: काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना भाजपकडून उमेदवारी?

पालघरः पोलीसनामा आॅनलाईन
काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना पालघर पोटनिवडणूकीत भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे. भाजपने गावित यांना पक्षात प्रवेश देऊन पालघरमधून उमेदवारी देण्याची रणनिती आखल्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. याबाबत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि आमदाराची बैठक झाली, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे.

शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने देखील आता आपल्या गोटातील हालचालींना वेग दिला आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांना उमेदवारी निश्चित झाली असून शिंगडा यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. यामुळे राजेंद्र गावित नाराज आहेत. भाजप गावितांचा उपयोग करुन काॅंग्रेससह शिवसेनेला शह देण्याचा डाव आखत आहे.