माझी सहमती नव्हतीच, अकबर यांनी बलात्कारच केला : पल्लवी गोगोई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ती सहमती नव्हती तो बलात्कारच होता. बळाचा आणि पदाचा गैरवापर करत एम. जे अकबर यांनी माझ्यावर बलात्कारच केला असे पल्लवी गोगोई यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप पल्लवी गोगोई यांनी केला होता. आरोपांवर स्पष्टीकरण देताना एम जे अकबर यांनी मात्र आपल्यातील शरीरसंबंध परस्पर संमतीने होते, असे म्हटले होते. यावर पल्लवी गोगोई यांनी ट्वीट करून स्पष्ट खुलासा केला आहे.

पल्लवी गोगोई यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी एशियन एजमध्ये काम करत असताना एम जे अकबर यांनी माझा शारिरीक, मानसिक छळ केला. ते मला शिव्याही द्यायचे. त्यांनी माझ्यावर बलात्कार केला हे सत्य ते नाकारत आहेत. सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते अशी कबुली त्यांनी दिली मात्र त्यात काहीही तथ्य नाही. मी माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे. एम. जे अकबर यांनी पदाचा गैरवापर करून माझ्यावर बलात्कारच केला हे मी कालही म्हटले होते आणि आजही तेच म्हणत आहे. मी माझ्या ट्विटर अकाऊंटवर आणि सोशल मीडियावर जे मांडले आहे त्यातला प्रत्येक शब्द खरा आहे. एम. जे. अकबर यांचा अनुभव ज्या ज्या महिलांना आला आहे त्या सगळ्या महिलांनी पुढे यावं आणि बोलावं असं मी आवाहन करते. कारण या माणसाचा खरा चेहेरा समाजाला समजलाच पाहिजे असेही पल्लवी गोगोईंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पल्लवी गोगोई यांनी प्रथम आरोप केल्यानंतर खुलासा करताना एम जे अकबर यांनी म्हटले होते की, १९९४ च्या आसपास मी आणि पल्लवी गोगोईने परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवले. काही महिने हे संबंध टिकले. या संबंधांमुळे अनेक चर्चा झाल्या. इतकंच नाही तर माझ्या कुटुंबातही कलह निर्माण झाला. परस्पर संमतीने ठेवलेले हे संबंध नंतर संपवण्यात आले.

जाहिरात