धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर अखेर पंकजा यांनी मौन सोडलं, म्हणाल्या…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाचा विषय आता मागे पडला आहे. तरीही सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचे मी कधीही समर्थन करू शकत नसल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे प्रकरणावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी मुंडे बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या की, कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा त्या कुटुंबातील ज्यांचा काही दोष नाही अशा लहान मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. सहाजिक एक नात म्हणून आणि महिला म्हणून मी याकडे संवेदनशीलपणे बघते. हा विषय कोणाचाही असता तरी मी त्याचे राजकीय भांडवल केले नसते आणि आताही करणार नाही. यात संवेदनशीलपणे विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच.

जातीनिहाय जनगणना व्हावी : मुंडे
ओबीसींची जनगणना झाली पाहिजे अशी भूमिका लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संसदेत वेळोवेळी मांडली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनीही याबाबत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना व्हायलायच हवी यातून प्रत्येक गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. आपल्याला त्या समूदायाला न्याय देताना मदत होणार असल्याचे मुंडे म्हणाल्या. दरम्यान शेतकरी आंदोलनाबाबत मुंडे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत आणि आताही सरकार शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवत आहे.