पेपर विक्रेत्याचा मुलगा करत होता Work From Home; इंजिऩिअर तरुणाला कोरोनाची बाधा झाली अन्…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे. अनेकांचे हसत-खेळत कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. अशातच पंढरपुरातील एका इंजिनिअर तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचा नुकताच साखरपुडा झाला होता. काही दिवसात त्याचे लग्न होणार होते. अत्यंत कष्टातून शिकवून मोठ केलेला तरुण मुलगा असा अचानक सोडून गेल्याने त्याच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

शुभम सोमनाथ भोसले (वय 24) असे मृत्यू झालेल्या इंजिऩिअर तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमनाथ भोसले हे पंढरपुरातील पेपर विक्रेते आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पै अन् पै गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आणि शुभमचे शिक्षण पूर्ण केले. शुभम हा अभ्यासात हुशार होता. वडिलांच्या परिश्रमाची जाणीव ठेवत त्याने शिक्षणात काहीही कसर सोडली नाही. पंढरपूरातील स्वेरी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर त्याला कोलकात्यात टीसीएस कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही लागली. त्यामुळे कुटुंबातील सगळेच आनंदी होते. पण त्यांच्या या आनंदाला कोरोनाची नजर लागली. कोरोनामुळे तो गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करत होता. या दरम्यान त्याचे लग्न ठरले अन् साखरपुडाही झाला. लवकरच त्याचे दोनाचे चार हात होणार होते. पण चार पाच दिवसापूर्वी त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला पंढरपूरमध्येच त्याने उपचार घेतले. पण त्यानंतर त्याला सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्रकृती आणखी खालावली. उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला.